तुम्हाला भक्त आणि देव यातील फरक माहिती आहे कां? देव कुणाला म्हणायचं आणि भक्त कुणाला म्हणायचं ? एक सोपी व्याख्या सांगतो जो देवापासून विभक्त नाही त्याला भक्त म्हणतात आणि जो सतत देतो. भक्तीपायी वेडा होतो. त्याला देव म्हणतात.
एक घाव दोन तुकडे. त्याच्यामध्ये अनुमान करण्याची गरज वाटत नाही. अशी देवाची भूमिका असते. म्हणून आपल्या प्रत्येक देवाच्या हातात एक तरी शस्त्र आहे. ते शस्त्र फक्त दुष्टांचा नाश करण्यासाठीच धारण केलेली आहेत. संत स्वतःसाठी कधीच जगत नाहीत ते जगाच्या कल्याणासाठीच जगतात. त्यांच्याकडे जगाची दुःख सहन करण्याचं ताकद असते. भक्तसुद्धा त्याच हेतूने देवाची सेवा करतो.
आज आपण देवाची चर्चा करण्यापेक्षा भक्तांची चर्चा करू या! कारण आपण सगळे त्या दत्त महाराजांचे भक्त आहोत. त्या प्रभूचे भक्त आहेत. भगवंताला आपण आपले मालक समजतो. कारण तोच आपे भले बुरे करतो. त्यामुळे तो आपला मालक आहे. मायबाप आहे. एखादा नोकर असतोना! तो आपले काम मालकाला आवडावे म्हणून सतत प्रयत्न करत असतो. मालकाच्या पसंतीला उतरावे अशी नोकराची इच्छा असते. मग मला सांगा? एखादी पतिव्रता स्त्री देखिल आपल्या मालकाच्या आज्ञेत राहणेच पसंद करते. आता जमाना बदलला सोडून द्या. पूर्वी नव्हे अजूनसुद्धा ज्या घरंदाज माताभगिनी आहेत. त्या आपल्या नवर्याला कधीही नावाने हाक मारत नाहीत. आदरानेच बोलतात. आताच्या स्त्री नवर्याला सरळ नावाने हाक मारतात. शिवाय आरेतूरेच्या भाषेत बोलतात. धर्म असा सांगतो की, नावाने हाक मारल्यास आयुष्य कमी होते. ते पातक लागते. धर्माने खुप चांगल्या गोष्टी यामागे सांगितल्या आहेत. त्यामध्ये पतीपत्नीचे प्रेम दृढ होत होते. असो. जरा विषयांतर झालं वाटतं. पण ओघात त्या गोष्टी आल्या म्हणून सांगून टाकल्या.
तर आपण काय बोलत होतो ? हांऽऽऽ आपण भक्त या विषयावर बोलत होतो. पाच मुख्य देवाचे पांच भक्त आहेत. एक म्हणजे गणपतीचे, शक्तीचे, सूर्याचे, शंकराचे, विष्णूचे असे ते प्रकार आहेत. तसे पाहिले तर अनेक देवांचे अनेक भक्त आहेत. बाकीचे शिल्लक राहिलेले सगळे तुम्ही आम्ही आमच्या संसाराचेच भक्त आहोत. पण आपण दत्त महाराजांच्या दरबारात बसलो आहोत म्हणजे दत्त आपला सगळ्याचा मालक आहे. त्यामध्ये ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे आणि शंकरभगवान आहे. सोबत शक्ती आहे. सूर्य आहे. चंद्र आहे. माता पार्वती आहे. आई लक्ष्मी, सरस्वती आहे. मग काहीही न करता सगळेच जन आहेत. एक दत्त मालक झाला आपल्या आणि इतके सगळे देव आले. ऐवढा मोठा मालक आहे आपला. त्याची सेवा करायची म्हणजे त्याला आवडेल असेच आपल्याला वागायला पाहिजे.
देवाचा भक्त तो देवासीच गोड ।
आणिकासी चाड नाही त्याची॥
असं तुकाराम महाराज म्हणतात. मग देवाचं आणि आपलं नातं काय ? कळलं नां ! तुम्हाला नाती या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का ? ना+ती=जी आपली नाहीत ती नाती. आता बघा । हे शरीर जो पर्यंतच आपली नाती आई, भाऊ, मामा, मामी, बहिण, काका, काकू, वहिनी, बायको, मुलगा, मुलगी वगैरे समजा ती एखादी व्यक्ति गेली. काय सांगणार ? कुठं आहेस ? नवरा, बायको, भाऊ, बहिण, संपलं ना सगळं शरीर संपले नाते संपले.
पण देवाचे नाते आपल्या शरीराची नसते. भक्ताच्या शरीराचा आणि देवाचा काही संबंध नसतो.
देह जावो अथवा राहो । पांडूरंगी दृढी भावो । तुकाराम महाराज म्हणतात, देवाचा संबंध भक्तांच्या जीवाशी आहे. म्हणून फक्त देवालाच जीवलग म्हणतात. “जीवाचे जीवलगे ये ई गे विठाई” म्हणजे शरीर संपले तरी देवाचे नाते कायम राहणार आहे. असं नातं प्रभू दत्त महाराजांच्या बरोबर आपल्याला निर्माण करायचे आहे. त्याला बाजूला काढूच शकत नाही.
एकदा एक श्रीमंत व्यक्ती आपल्या पत्नीला घेऊन कारने तीर्थयात्रेला निघाले. पाच जणांची बैठक व्यवस्था होती. त्यामुळे पत्नीने न सांगताच आपल्या बहिणीला आणि भाऊजीला आग्रहाने तीर्थयात्रेस बोलावून घतले होते. स्वतःच्या मुलाने लग्न नुकतेच झालेले असल्याने तो येणार नाही याची श्रीमंतांना खात्री होती. त्यामुळे एक ड्रायव्हर आणि हे चार जण गाडीत बसले. गाडी निघणार इतक्या नवीन नाते जोडलेल्या सूनबाईंच्या आई पिशवी घेऊन गाडीजवळ आल्या. मी पण येणार आहे असे म्हणाल्या. नवीनच नाते संबंध. नाही म्हणणे शक्यच होईना. गाडीतून कुणाला उतरावे पेच निर्माण झाला. शेवटी श्रीमंत शेठ म्हणाले ड्रायव्हरला खाली उतरवू या ? पण मग गाडी कशी पुढे जाणार ? सगळे खाली उतरवून फक्त ड्रायव्हर ठेवला तर गाडी पुढे जाऊ शकेल.तात्पर्य दत्त प्रभू हे या जीवनाच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत. त्यामुळे बाकीच्या नातेवाईकांना गाडीतून खाली उतरवले तरी चालेल. पण दत्तप्रभूंना नको. असे त्यांचे भक्त बना. आजून बरेच काही सांगण्यासारखे आहे. परंतु पुढे कधी तरी बोलून. आता तूर्त फक्त दत्तप्रभूंचे नामस्मरण करा.
नामसाधना भक्तिचे बळ
भक्तजन हो आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये किती कितीजनांचा हात लागला असेल. अनेकजण अनेक दिवसापासून झटत असतील तेव्हा कुठे आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने जमू शकलो. हे कशाचे फळ आहे. तर ते नामसाधनेचे, भक्तिचे बळ आहे.
सहज आठवलं म्हणून सांगतो. ज्यांच्याकडे अध्यात्मके बळ आहे. तीचं माणसं भक्तिमार्गावरून चालतात. बलहीन माणसास आत्मलाभ कधीच होत नाही असं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. “नायं आत्मा बलहिनेन लभ्यः॥” असं श्रृती माऊलीही म्हणते बरं का ?
अंऽऽ तर काय सांगत होतो मी ? तसे बळाचे अनेक प्रकार आहेत. परंतु आपण फक्त कोणत्या बळाने दत्त महाराजांची प्राप्ती होते? ते समजून घेऊत! तर बळाचे खरें दोनच प्रकार आहेत पारमार्थिक बळ आणि व्यवहारिक बळ त्यातील व्यवहारिक बळ, सगळ्यांना माहिती आहे. ते काही सांगावयाची गरज नाही. कोणत्याही व्यक्तिला स्वार्थ साधावयाचा असेल, मग तो वैयक्तिक असो, राजकिय असो, सार्वजनिक असो, सांघिक असो किंवा अन्य कुठलाही असो. त्यावेळी आपल्या जवळ असलेल्या क्रय शक्तिचा जो प्रभावशाली वापर करतो त्याला व्यवहारिक बळ म्हणतात. सत्ता, संपत्ती, शक्ती, सांघिक, बुद्धी अशा पाचस्तरावर ते वेगवेगळे असते. आता सध्या कलीयुग चालू आहे. “बळी तो कान पिळी” अशी आपल्याकडे म्हणंच पडली आहे. सध्या बुद्धिवंताला धनवंतापेक्षा कमी मान आहे.”
बघाऽऽ । सगळीकडं लबाडांचंच राज्य आहे का नाही? गुणवंत, बुद्धिवंत अडगळीत पडलेले आहेत आणि ज्याच्याकडे पैसा आहे धनवान आहे. वाममार्गाने मिळविलेली संपत्ती आहे त्याला केवढा मान आहे. वाईटाला मोठा मानसन्मान आहे. ते क्षणिक सुख मिळविण्यासाठी चढाओढ लागली आहे. परंतु परमार्थातील शाश्वत सुखाची मात्र आवश्यकता कुणालाच नाही. लबाडलोक मोठ्या आलीशान बंगल्यात रहात आहे. त्यांच्याकडे गाड्या, नोकर-चाकर सगळे आहे. रात्री मद्यपान केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. याउलट बुद्धिवंतांना जेमतेम जागेत रहावे लागते आहे. पण तो समाधानी आहे. कारण त्याला बंगला, गाडी, नोकर-चाकर यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. त्यात त्याचे मन रमत नाही. हा सगळा कलीयुगाचा महिमा आहे. नामस्मरणाकडे जो वळला त्याला असले भौतिक सुख क्षुल्लक वाटते. त्याला इच्छाच होत नाही. अशी माणसं सदोदीत आनंदीत असतात. तुकडोजी महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे. याला म्हणतात पारमार्थिक बळ. तुमच्याकडे जेवढी जास्त संपत्ती तेवढी तुम्हाला जास्त चिंता असते. याचा अर्थ असा नव्हे की, संपत्ती मिळवूच नये ? गरजेपूरती असावी. कोणतीही गोष्ट अती झाली की, ती चिंतेला कारणभूत होते. हे नक्की ! लक्षात ठेवा.
एका धान्याच्या गोडावूनमध्ये अनेक उंदीर गुण्यागोविंदाने रहात होते. तिथे एक भलामोठा साप जायचा आणि दररोज एक उंदीर खाऊन टाकायचा बरेच दिवस असाच प्रकार चालला होता. एक दिवस एक म्हातारा उंदीर तरूण उंदरांना म्हणाला ! बाबांनो, हा एकटा साप आपलं कुळंच संपवेल. तो आला की तुम्ही तरूण पळून जाता कुणीतरी एकजण त्याच्या तावडीत सापडतो. तरूण उंदरांनी म्हातार्या उंदराला विचारले, “आम्ही काय केले म्हणजे हे थांबेल ?” म्हातार्या उंदराने सांगितले,” एके दिवशी सगळेजण तुम्ही गुपचूप एकत्र येऊन बसा. त्याने कुणालातरी खाल्ले की हा सुस्त पडतो. त्याला पोट भरलेकी झोप येते त्याचवेळी एकीचे बळ वापरा आणि एकदम सगळ्यांनी मिळून त्याच्यावर हल्ला करा. तुमच्या टोकदार दातांनी त्याच्या अंगाचा चावा घ्या. रक्तबंबाळ करून त्याचे तुकडे तुकडे करा. एक दिवस तसेच झाले. साप रक्ताने माखला. जखमी झाला. अंगाचे लचके तोडल्याने मरून गेला. संकट टळले.गावात, घरात, समाजात, धर्मकार्यात, परमार्थात अशी एकजूट केली तर सगळ्यांचा उद्धार होतो. अबाळ, वृद्ध, महिला, माता भगिनी, साधु संत, धर्माचार्य यांचं रक्षण होतं. म्हणजेच धर्माचं रक्षण होत. जो धर्माने वागतो. रक्षण करतो. त्याचे धर्म रक्षण करतो.
भारतीय संस्कृती जगाला कव्यात घेणारी
आतापर्यंत आपण निरनिराळे ग्रंथ वाचले, अनेक ग्रंथांचे पाराणे केली, निरनिराळ्या पोथ्या ऐकल्या, वाचल्या. निरनिराळ्या कथा वाचल्या, ऐकल्या कदाचित या कथा आपल्याला तोंडपाठ झाल्या असतील. महाभारतातील काही प्रसंग पाठ झाले असतील. पांडव प्रताप असेल, हरिविजय असेल किंवा रामायण असेल, रामविजय, भक्तिविजय असेल, तर भगवंताचा महिमा काय आहे किंवा संताचा महिमा काय आहे ते आपण या कथांतून ऐकल्या आहेत. पण एवढे सगळं ऐकून, वाचून पाहून सुध्दा आमच्यामध्ये काय परिवर्तन झाले याचे चिंतन करायचे आहे. संताने आपल्याला नेमका रस्ता कुठला सांगितला. भगवंतांनी संतांना जो उपदेश केला तो कशा पध्दतीने केला? रामायणामध्ये, महाभारतामध्ये, भागवतामध्ये, पांडवप्रताप, हरिविजय आदी सगळ्या ग्रंथांमध्ये संतांचे आणि त्यांच्या भक्तांचे संवाद आले. एक एक जण त्या संवादांना पाठ केल्यासारखं सांगू शकतील. एवढी विद्या संपादन केली पण या सगळ्या ज्ञानाचा काय उपयोग. स्वतःसाठी त्याच्यातील काही घेतलं का नाही याच्या बाबतीत एक उदाहरण आहे.
आपण सगळे गंगास्नानला जातो. गंगा म्हणजे पवित्र आणि त्या गंगेवर आमची इतकी श्रध्दा आहे की आम्ही अंघोळ करताना तिचे नाव घेतो किंवा सगळ्या नदींचे नाव घेतो. आपण यांना अनुभवावरुन पवित्र मानतो. काही भक्तांचे काही संतांचे अनुभव आहेत आपण कितीतरी देवाची पूजा करतो मग ती पूजा करत असताना तुम्हाला काही विशेष अनुभव आला की नाही.
समजा आपल्या सोबत एखादी चांगली घटना घडली तर देवाचं नाव येत का? आणि समजा वाईट घटना घडली तर आपण देवाच्याच नावानं बोलतो पण प्रत्यक्षात त्याच्याशी देवाचा काहीही संबंध नसतो. पण तुम्ही जर असं म्हणाल की सर्व करतो तो देवच करतो. पण या गोष्टीवर तर तुमची पूर्ण श्रध्दा आहे का? जे चांगलं करत असेल तर देव करतो वाईट करत असेल तरीही देवच करतो अशी तुमची ठाम भूमिका आहे का? सगळेजण फक्त दुःखातच देवाला हाक देतात पण आपला अनुभव आहे की देव कधीच धावून येत नाही. एका इंग्लिश लेखाने पायाबद्दल फार छान लिहिलं आहे. तो असं म्हणतो, की मी खूप दुःखात होतो. त्यामुळे समुद्रकिनारी गेलो आणि तिथे समुद्रकिनारी वाळू होती. त्या वाळूत थोडं पाणी असत त्या प्रकारच्या वाळूतून तो चालत होता आणि त्या वेळेस तो एकटा चालला होता. पण तो जेव्हा चालत होता, तेव्हा त्याच्याबरोबर दुसरे दोन पावलं उमटले. थोडं अंतर चालल्यानंतर ते दोन पावलं त्याच्याबरोबर आलेच नाहीत. मग अचानक त्याने वळून बघितले की, आपल्या सोबत कोणी आहे का? तर लांबवर त्याला स्वतःची पाऊले दिसली आणि सोबत आणखीन दोन पावले दिसली त्यानं विचार केला हे अस कसं काय झालं? आणि तो भक्त होता देवाचा. त्याने देवाला विचारले की देवा काही अंतरापर्यंत तू माझ्यासोबत होतास आणि नंतर मला सोडून का गेलास त्या वेळेस देवानं त्याला सांगितलं, बाबा ज्यावेळेस तू दुःखात होता तेव्हा मी तुझ्यासोबत होतो आणि तू सुखात आलास की तू मला विसरुन गेलास, मी तर तुझ्यासोबतच होतो. आपल्याला हे कळत नाही की भगवंत आपल्यासोबत कुठून कुठपर्यंत चालत आलाय. आपण मोहामध्ये, मायेमध्ये कुठेतरी अडकून बसलेलो असतो की तो देव कधी पाठमोरा झाला. हे लक्षात येत नाही हे लक्षात घ्या की देव आपल्याला कधीही सोडत नाही. तर आपणच देवाला सोडतो.
जर तो आपल्याबरोबर असतोच तर त्याला दोष का द्यायचा. म्हणून आपण ग्रंथामधून जे वाचतो त्याच्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये काय बदल झाला हे सुध्दा पाहणे गरजेचे आहे. आपण देवाची पूजा करतो. कोणी याचा विचार केला की देवाची पूजा का करावी? कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? पूजा का करावी? आपण पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातो किंवा मंदिरात दर्शनाला जातो. आपण तिथं का जातो? काहीतरी कारण असेलच ना तर ते आहे मानसिक समाधान.
संताचे तत्वज्ञान खूप मोठे आहेत. संत आपल्याला धर्म शिकवतात. पण आताच्या काळात आपले लोक धर्म विसरले आहेत. आताचे काळातील लोक शास्त्र विसरले आहेत. जर आपल्याला शास्त्र माहीत करून घ्यायचं असेल तर ग्रंथ, पोथ्या वाचणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानुसार वागणं पण गरजेचे आहे. आपली संस्कृती, शास्त्र इतक प्रबळ आहे की आपण दगडामधून सुध्दा देव प्रगट होतो. इतकं सामर्थ्य आहे. आमच्यामध्ये पण आपण काय करतोय खर्या देवाला दगडाचं करतो आहोत. शास्त्र असे सांगते की, आम्ही अमृत पुत्र अमर आहोत. पण आमची वाटचाल कशी असायला हवी? मरण आपल्या देहाला आहे की आत्म्याला? त्यामुळे संत आपल्याला जागोजागी सावध करतात. पण आपला धर्म, शास्त्र हा टिंगलीचा विषय झाला आहे. कारण आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा करतात. पण आपल्याला माहिती आहे का, सत्यनारायणाची पूजा का करतात आणि त्याचं काय महत्त्व आहे. कुणालाच माहित नसतं. आपल्या भारतीय संस्कृतीत संस्कार ही एक खूप मोठी बाब आहे.
जर आपण महाभारत, रामायण हे ग्रंथ वाचले तर आपोआप सस्कार झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपली संस्कृती सर्व जगाला आपल्या कव्यात घेणारी आहे. आमची संस्कृती मायबापाला देवाच्या वर मानणारी आहे. आमची संस्कृती ज्येष्ठाचा आदर करणारी आहे. तसेच विद्वानांचा आदर करणारी आहे. आणि आमची संस्कृती मातीला, दगडाला सुध्दा आई म्हणणारी आहे. इतकं प्रचंड प्रेम आमच्या संस्कृतीत आहे की या जगात तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि जगामध्ये आमचा एकमेव देश आहे की जेथे देशाला आई म्हटले जाते. मग अशा संस्कृतीच्या देशामध्ये तुम्ही देवाला देव म्हणायला तयार नाहीत?
आपल्याला माहित आहे, भगवंताने एक अवतार म्हणजे मत्स्य अवतार घेतला. त्या अवतारामध्ये भगवंताने पुरुषार्थ शिकवला. फक्त पुरुषार्थच नाही तर भगवंताने आपल्याला जीवंत रहायला शिकवलं ते कसं? आपण मासे पकडण्यासाठी कुठे जातो नदीवर आणि नदी नेहमी तिच्या प्रवाहाच्या दिशेने वाहते, पण मासा नेहमी प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहतो, जर मासा पाण्याच्या दिशेने वाहत असेल तर त्यावेळेस समजावं की तो मासा जिवंत नसतो. तुम्ही एक निरीक्षण केलं असेल तर पावसातून मासे पडताना दिसतील. खरंतर ते पडत नसतात तर ते प्रवाहाच्या दिशेने वर चढतात. पावसाच्या धारेबरोबर वर चढतो आणि वार्याने फेकला जातो. तो नेहमी पाण्याच्या उलट्या दिशेने वाहत जातो. धाडस करतो, पुरुषार्थ करतो, तो असतो मासा. देवाने खेकड्याचा जन्म का घेतला नाही. खेकड्याचा गुणधर्म काय आहे हो. तो दुसर्याचे पाय पण ओढतो. मासा दुसर्याचा विचार न करता आपला जीव वाचवण्यासाठी स्वतः पुढे निघून जातो. इथे परमेश्वराने मत्स्य अवतारामध्ये हेच सांगितले आहे की, पुरुषार्थ करा. जसा पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही अशा प्रकारे परमेश्वराने सांगितलं आहे की मी तुमचाच आहे.
प्रयत्न मी आहे तुमच्यासाठी हा भगवंत दोन्ही हात उभारून सांगतोय पण आम्ही खेकड्याप्रमाणे कोणी वर जात असेल त्याला खाली ओढतो अशी अवस्था आहे आमची. म्हणून आम्हाला भगवंताच्या अवताराविषयी सत्य काय आहे जाणूून घ्यायची आवश्यकता आहे. त्याच्यातील विज्ञान काय आहे ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
असं भरकटल्यासारखं वागू नका. भरकटल्यासारखं करू नका आपला धर्म समजा काय आहे तो आपला देव समजा काय आहे तो आणि आपली परंपरा काय आहे ते समजून घ्या आणि समजत नसेल तर ज्याला समजते त्याला विचारून समजून घ्या आणि आपल्या संस्कृती आणि परंपरेविषयी जाणून घ्या मासा व्हा आणि देवाकडे जा, मासा व्हा आणि पाण्यात जा तसंच माणूस हो आणि देवत्वाकडे जा. ‘नरकरणी करे तो नर का नारायण हो जाये’ हे तत्त्व आपल्या संस्कृतीचे, धर्माचे विसरू नका आणि हे तत्त्व आपल्या परंपरेच आहे ते विसरू नका आम्ही सुध्दा ईश्वराप्रमाणे होऊ शकतो. कारण माऊलीनी स्वत: उदाहरणच सांगितले आहे की ‘हे विश्वची माझे घर’ ऐसी मती जयाची स्थीर किंबहूना चराचर आपणची झाला. म्हणून प्रत्येक गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करा धर्माने, संस्कृतीने, परंपरेचे विचार करा ही पुण्यभूमी ही पवित्रभूमी ज्या भूमीवर भगवंताने आपले नाना अवतार घेतले आहेत. या भूमीवरील प्रत्येक मातीचा कण पवित्र झाला आहे. असा देश जगाच्या पाठीवर कुठेही नाही जिथे देवांनी जन्म घेतला, देव रांगले, खेळले आणि जिथे देवीने माणसाचा हात धरला व माणसाला देवत्वाकडे घेऊन गेले. त्यामुळे या जगात असा कुठला देश नाही की ज्याची संस्कृती ज्याचा धर्म, ज्याची परंपरा इतकी श्रेष्ठ आहे, आणि अशा देशात आमचा जन्म झाला आहे याचा निश्चितपणाने आम्हाला अभिमान आहे. ही पुण्याई तुमच्यापाशी आहे ही पुण्याई सोबत घेऊन जीवनाचा प्रत्येक पाऊल पुढे टाका. देव नेहमी तुमच्याबरोबर राहील.

No comments:
Post a Comment