भाग्यनगरमध्ये चोरट्यांचे भाग्य’ उजळले नांदेडात चोरटे सक्रीय;पोलिस निष्क्रिय!

Friday, December 21, 2018


नांदेड/प्रतिनिधी- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी, दुचाकींच्या चोर्‍या या रोजच्या घटनांमुळे नागरिक हैराण झालेलेअसताना आता घरफोड्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या 15/20 दिवसांपासून घरफोड्यांचे सत्र सुरुच असून त्यावर अंकुश ठेवण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले आहे.

 सतत होणार्‍या घरफोड्यांमुळे नागरिकांत प्रचंड दहशत पसरली असली तरी भाग्यनगर हद्दीत चोरट्यांचे भाग्य’ उजळले आहे. कधी एकाच दिवशी दोन घरफोड्या तर कधी दोन दिवसाआड लोकांची घरे फोडली जात असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांतून रोष व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर चोरट्यांनी एका निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज पळविला. चोरट्यांचा हैदोस सुरूच असल्याने चोरटे सक्रीय-पोलीस निष्क्रीय’ अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

सेवानिवृत्त न्यायाधीश लक्ष्मण नागोराव देवकर हे मालेगाव रोडवरील स्वप्नजा गार्डनमध्ये राहतात. त्यांचा मुलगा मध्यप्रदेश येथील जबलपूर येथे असल्याने मुलास भेटण्यासाठी 20 डिसेंबर रोजी जायचे असल्याने तयारी करत होते. कपडे खरेदी करण्यासाठी म्हणून पती-पत्नी घराला कुलुप लाऊन वजिराबाद मार्केटमध्ये गेले. सायंकाळी सात वाजता ते घरी आले असता घराचा कडी कोंडा तुटलेला दिसला. यावेळी अज्ञात चोरट्याने घरातील सामान अस्ताव्यस्त करून टाकलेले आढळून आले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाग्यनगर पोलिसांशी संपर्क साधला. या घरफोडीमध्ये चोरट्याने अडीच लाखाचे सोन्याचे दागीने तसेच नगदी 20 हजार रूपये असा एकूण पावनेतीन लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने नागरिक हादरून गेले. याप्रकरणी लक्ष्मण देवकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 454, 380 भादंवीप्रमाणे गुन्हा दाकल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment