अंबाजोगाई (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूक आचरसंहितेपुर्वी मराठा समाजाने एकत्र बसुन मुक मोर्चाचे सर्व समन्वयक यांची समिती गठीत करावी.या समितीने सरकारशी सकारात्मक चर्चा करून वाटाघाटी मार्फत मराठा आरक्षणाची मागणी पदरात पाडुन घ्यावी तसेच राज्य सरकारने गेल्या निवडणूकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा दिलेला शब्द पाळावा व मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा,देशाची राज्य घटना,संविधान व कायदेशीर चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे.त्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करू नये, भावनिक होवू नये, कोणतीही जाळपोळ, मोडतोड तसेच हिंसक आंदोलन करू नये तर समाजातील इतर सर्व घटकांशी संवाद साधावा.तसेच मराठा समाजाने सरकारशी आरक्षण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले.ते अंबाजोगाईत मराठा जनसंवाद अभिनाअंतर्गत जाहीर सभेत बोलत होते.
अंबाजोगाई येथील आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात रविवार,दि.9 सप्टेंबर रोजी मराठा जनसंवाद अभियानांतर्गंत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.पुरूषोत्तम खेडेकर यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. “मराठा आरक्षण : वास्तव आणि दिशा" या विषयावर आपले मौलिक चिंतन अॅड.पुरूषोत्तम खेडेकर यांनी उपस्थित बहुजन समाज व सकळ मराठा समाज बांधवांसमोर ठेवले. यावेळी विचारमंचावर मराठा सेवा संघाचे प्रदेशकार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष इंजि.लिंबराज सुर्यवंशी,तहसीलदार विद्याचरण कडवकर,इंजि.नवनाथ घाडगे,अॅड.अनंतदादा चोंदे,रमेश गुजर,उद्धवराव आपेगावकर, सौ.घाडगेताई,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मुंबई येथे मराठा सेवा संघाचा 28 वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करणारे इंजि.नवनाथ घाडगे यांची ग्रंथतुला व हृद्य सत्कार यावेळी करण्यात आला.तसेच परभणी येथील तहसीलदार विद्याचरण कडवकर यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला.सोबतच दिव्यांग मुलीसोबत विवाह करणारे कैलास विक्रम शेळके यांना ही सन्मानीत करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना अॅड.पुरूषोत्तम खेडेकर यांनी मराठा समाज बांधवांशी संवाद साधला.देशातला मुळात वाद हा सांस्कृतिक आहे असे सांगुन धर्माच्या नावावर सर्वांधिक मृत्यू झाले आहेत. मराठवाडा हि भूमी संत व वारकर्यांची आहे.या भूमितुन देशाला दिशा देण्याचे काम झाले. मराठा समाजाने राज्यात अतिशय शिस्तबद्धरित्या ऐतिहासिक मोर्चे काढले.मराठा समाजाचे मोर्चे हे एक वादळच होते.हे सांगुन संविधानाने दिलेली स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता हि मुलतत्वे जपा,ही मानवतावादी मुलतत्वे मराठा समाजाने पाळावीत व स्वतःचा विकास साधावा.भविष्यात सरकार नावाची संकल्पना उरणार नाही.
माहिती तंत्रज्ञानाचे हे युग आहे.गेल्या 10 हजार वर्षात शेतीने आपणाला जगविले.खुप काही दिले.आज शेती हा तोट्याचा व्यवसाय बनला आहे. तेंव्हा शेतीतून बाहेर पडा, स्वतःला ओळखा, स्वतःतील कल्पकता,बुद्धी, मेहनत यांच्या बळावर मोठे व्हा कारण श्रीमंती ही झटपट मिळत नाही. यासाठी मराठा समाजात आर्थिक साक्षरता आली पाहिजे.भाषा चांगला रितेने वापरा,चांगला संवाद करा,कुटुंब एकत्र ठेवा,मुलांवर चांगले संस्कार करा,निर्व्यसनी निरोगी रहा, जग बदलाचे शिलेदार व्हा,जगात जे चांगले त्याचा स्विकार करा, स्त्रियांना सन्मान व स्वातंञ्य द्या,स्त्रि जन्माचे स्वागत करा,कुंटुंबातील आई-वडीलांचा आधार व्हा. गावकुसाबाहेरील इतर समाजाचे प्रश्न समजावून घ्या असे आवाहन करून समाजात नायक असलेला मराठा बांधव ठोक मोर्चामुळे खलनायक म्हणुन समाजासमोर आला. समाजाची तशी प्रतिमा निर्माण झाली.या बाबत खंत व्यक्त करून ठोक मोर्चा सारखे आंदोलन मराठा समाजाला परवडणारे नाही.यातून समाजात दुही निर्माण होते.कारण,राज्यात मराठा समाज मोठा भाऊ आहे.आक्रमक होवून आरक्षण मिळणार नाही.यात बदल करावा लागेल.समाजातील सर्वपक्ष, संघटना,विचारपिठ,विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येवून समाजाचे नेतृत्व निर्माण करावे लागेल. कारण,आंदोलनाला नेतृत्व असल्याशिवाय उपयोग नाही.58 मुक मोर्चे निघुन ही मराठा समाजाच्या पदरात काहीही पडले नाही.कर्जमाफी झाली नाही, शेतकर्यांना पिक विमा मिळाला नाही, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही.
त्यामुळे ही कोंडी फुटली पाहिजे, सरकारशी चर्चा करण्यासाठी व मुख्यमंत्र्यांवर मराठा समाजाचा दबाव निर्माण करण्यासाठी समिती गठीत करून या समितीने सरकारशी बोलणी करावी,वाटाघाटी करावी, लोकसभा निवडणूकीपुर्वी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करून राज्यातील कोणत्याही ओबीसी नेत्यांचा मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही.आज मराठा समाज शैक्षणिक,सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास असून शेतकरी आत्महत्येचे,बेरोजगारीचे प्रमाण मराठा समाजात अधिक आहे. शिक्षणापासुन मराठा समाजाची मुले-मुली वंचित राहत आहेत.आरोग्य विषयक सोयी सुविधांचा अभाव आहे.शिक्षणात व नौकरीत मराठा समाज पुढे जावा यासाठी सरकारने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहत न बसता तात्काळ ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करावा. कारण,आयोगाचा अहवाल यायला उशिर होईल व कदाचित तोपर्यंत लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू शकते.त्यामुळे मराठा समाजाने आरक्षणासाठी मुख्यमंत्री व सरकारवर समिती गठीत करून दबाव निर्माण करावा असे आवाहन अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले.गेल्या काही दिवसांत मराठा समाज मराठा आरक्षणा संदर्भात बरेचसे समज-गैरसमज निर्माण झाले त्यातून बहुजन समाजामध्ये संवादाची दरी निर्माण झाली होती.त्यामुळे मराठा आरक्षणा संदर्भातील वास्तव व त्याची पुढील दिशा काय असणार आहे. याबाबतची उकल,माहिती व मार्गदर्शन अॅड.पुरूषोत्तम खेडेकर यांच्या जाहिर सभेतून झाली.

No comments:
Post a Comment