वीज प्रश्‍नासाठी बोरी ग्रामस्थांचा रास्तारोको

Saturday, December 22, 2018



हिंगोली / प्रतिनिधी
दोन महिन्यांपासून गाव अंधारात असतानाही वीज वितरण कंपनीकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वसमत तालुक्यातील बोरी येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत बोरी पाटी येथे 21 डिसेंबर रोजी रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनाने खडबडून जागे झालेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी आश्‍वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.


जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून वीज प्रश्‍न पेटला आहे. बहुतांश भागातील ग्रामस्थ, शेतकर्‍यांना नादुरूस्त रोहीत्र बदलून मिळत नसल्याने आंधारचा सामना करावा लागत आहे. शिवाय सध्या रब्बीच्या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. परंतू, रोहित्राअभावी ते देणे शक्य होत नसल्याने शेतकर्‍यातूनही संताप व्यक्त होत आहे. वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथेही मागील दोन महिन्यांपसून आंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांना वेळोवेळी सांगूनही हा प्रश्‍न सोडविल्या जात नसल्याने शुक्रवारी ग्रामस्थांनी बोरी पाटीवर एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले.

ग्रामस्थांच्या आंदोलनाने खडबडून जागे झालेल्या वीज वितरण अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळ गाठत ग्रामस्थांशी चर्चा केली. रोहित्राचे रखडलेले काम आजच पूर्ण करण्यात येईल तसेच दोन नादुरूस्त असलेले गावठाणचे रोहीत्र सोमवारी देण्यात येतील यासह वीज प्रश्‍न सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी वीज वितरणचे अभियंता अब्दुल जब्बार गणी, शाखा अभियंता डी.एम.जाधव, सरपंच माणिक सावंत यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment