औवेसी यांच्यापुढे काँग्रेस, भाजपा सेनेसह 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Tuesday, December 11, 2018

एमआयएमचे वादग्रस्त नेते अकबरुद्दीन औवेसी यांच्यापुढे काँग्रेस, भाजपा अन् शिवसेनेसह 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून ओवैसी यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे औवेसी यांच्याविरोधात लढणा-या शिवसेना उमेदवाराला केवळ 112 मतं मिळाली आहेत. त्यामुळे हैद्राबादच्या चंद्रयान गुट्टा मतदार संघावर वर्चस्व राखण्यात औवेसी यशस्वी झाले. 

चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून अकबरुद्दीने औवेसी यांनी पाचव्यांदा आपला गड कायम राखला. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा अकबरुद्दीन औवेसी यांनी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि औवेसी बंधूंमध्येही शब्दयुद्ध रंगलं होतं. त्यामुळे एमआयएमच्या निवडणुकीतील कामगिरीबद्दल उत्सुकता होती.

त्यामध्ये केवळ भाषणबाजीतूनच नाही तर, मतदारांना आपल्याकडे खेचण्यातही अकबरुद्दीन यांना यश मिळाले आहे. अकबरुद्दीन यांना 64,853 मतं मिळाली असून त्यांच्याविरोधातील काँग्रेस उमेदवाराला 7475 मतं मिळाली आहेत. तर, भाजपा उमेदवाराला 8137 मते घेण्यात यश आले.

तसेच राज्यात सत्ता राखण्यात यशस्वी ठरलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला येथील जागा खेचून आणण्यात अपयश आले आहे. कारण, टीआरएसच्या उमेदवाराला येथे 7658 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे औवेसींपुढे काँग्रेस, भाजपा, टीआरएससह शिवसेना आणि इतर सर्वच अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

No comments:

Post a Comment