घराचा दरवाजा तोडून दिड लाख लंपास

Sunday, November 25, 2018

वसमत / प्रतिनिधी  - घरात कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी दिवसाढवळ्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख 43 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना वसमत शहरातील बॅंक कॉलनी भागात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वसमत शहरातील बॅंक कॉलनी भागातील अंकीत अजीतकुमार यंबल यांचे निवासस्थान असून, कुटुंबीय घराबाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंतीवरून आत उडी मारून दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन खोल्यातील लोखंडी कपाट, लॉकर, ड्रॉप उघडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, तसेच रोख रक्कम असा एकूण 1 लाख 43 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. यंबल कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी ही माहिती शहर ठाण्यात दिली. पोलिसांनी पंचनामा केला असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment