आज जनसंघर्ष यात्रा लातूरात सभेची जय्यत तयारी

Wednesday, October 24, 2018

लातूर प्रतिनिधी:
केंद्र आणि राज्यामधील शासनाच्या कारभाराचा पंचनामा करुन आणि सर्वसामान्य जनतेला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा बुधवार दिनांक २४ आक्टोबर रोजी लातूरात येत आहे. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे भव्य जाहिर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

लातूर जिल्ह्यात जनसंघर्ष यात्रेचे आज दि. २४, बुधवार रोजी सकाळी औसा, दुपारी निलंगा येथे आगमन होईल. या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आलेल्या काँग्रसे नेत्यांचे मार्गदर्शन होइ्रल्‍. येथील जाहिर जाहिर सभा झाल्यानंतर सांयकाळी लातूरात संघर्ष यात्रेचे आगमन होईल, जनसंघर्ष यात्रेचे लातूरात सांयकाळी ५ वाजता मोटारसायकल रॅलीने स्वागत होईल. राजीव गांधी चौक, शिवाजी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे यात्रेचे आगमन होईल. जनसंघर्ष यात्रेचे सांयकाळी ६.०० वाजता सभेत रुपांतर होईल.

या सभेत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशिलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, अरिफ नसीम खान, अब्दुल सत्तार, प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मराठवाडयातील डी.पी.सावंत, बस्वराज पाटील, मधुकरराव चव्हाण, भारत भालके, धिरज देशमुख, सिध्दाराम म्हेत्रे, विकास अवनाडे, राजू वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर नेते सभेला संबोधित करतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर या सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आले असून संपूर्ण शहर तिरंगी झेंडा व फलकांनी काँग्रसेमय झाले आहे. यासाठी पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेतच. सभेस लातूर व परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, महिला पदाधिकारी सुनिता आरळीकर, स्मिता खानापूरे, सपना किसवे, विद्या पाटील तसेच विविध सेलचे पदाधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment