लातूर, दि. 23
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचांग काढून मुहूर्त न पाहता दुष्काळ जाहीर करावा, उपग्रहाद्वारे दुष्काळाची पाहणी करणार्या सरकारला सर्वसामान्य माणसाचा आक्रोश, फरफट दिसत नाही का ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. लातूर येथे शिवसेना बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी खा. रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, अभय साळुंके, संतोष सोमवंशी, विश्वनाथ नेरुळकर आदी उपस्थित होते.
बर्याच वर्षानंतर लातूरला आलोय, याठिकाणी पाणीटंचाई आहे, दुष्काळ आहे, सोबतच शिवसेनेसाठीही लातूर हा दुष्काळी जिल्हा आहे. बुथ प्रमुखांनी मेहनत करुन तो दुष्काळ दूर करावा, जनता शिवसेनेकडे अपेक्षेने पाहात आहे, निश्चयाचे महामेरु व्हा, लातूर जिल्ह्यातील सेनेचा राजकिय दुष्काळ संपवून जिल्हा भगवेमय करा असे आवाहन करुन उद्धव ठाकरे म्हणाले की, लातूरच्या पाणीटंचाईवर तात्पुरती मदत केली गेली परंतु कायमस्वरुपी तोडगा का काढण्यात आला नाही.
मी जनतेच्या बाजूने
मी सरकारच्या विरोधात नव्हे तर जनतेच्या बाजूने बोलतो असे सांगून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र सोडले. सरकार म्हणजे राजा असतो, सर्वसामान्यास हेच लागते तेंव्हा ज्यांच्या तोंडून आई गं निघतं तोच राजा असतो मात्र येथे सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडली असताना पंतप्रधान कुठे आहेत ? असा प्रश्न उपस्थित करुन ते म्हणाले दुष्काळ जाहीर करण्यासाठी समित्या, पंचांग, अभ्यासाची वाट पाहता मग नोटबंदी कशी झटक्यात केली, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवताना, करवाढ करताना समित्या, अभ्यास नसतो त्याप्रमाणे दुष्काळासाठी टाईमपास न करता तात्काळ दुष्काळ जाहीर करावा.
फसव्या योजनांचा पाऊस
गटप्रमुखांनी मतदार यादीनुसार गावा-गावात, घरोघरी जावे, संपर्क करावा, सरकारच्या चार वर्षातील जाहिराती, फसव्या योजनांचा पाऊस जनतेसमोर निदर्शनास आणाव्या, आज सरकारच्या अनेक योजना बंद पडत आहेत, 2022 पर्यंत सर्वांना घरे देवू हे पण निवडणूकीचे जुमले आहेत. आता तुम्ही त्यांना विचारा अच्छे दिन कब आएँगे ? तुम्ही जनतेला खोटं बोलून मतं घेतली पण त्याचा वाटेकरी मी होणार नाही, ते माझे संस्कारही नाहीत असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
राममंदीरसुद्धा जुमला
अटलजीचे सरकार मजबुत नव्हते पण आत्ताचे सरकार मजबुत असताना अयोध्येत राम मंदिर का बांधू शकत नाही ? तुमच्यासाठी राम मंदिर सुद्धा जुमला होता हे एकदाचे जाहीर करुन टाका अशी टिका करुन उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिर उभारण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची वाट कसली पाहता ? न्यायालयाने दिलेले बरेच निर्णय तुम्ही बदलले आहेत तसाच राममंदिराचा निकाल लावा यासाठीचा राममंदिराचा मुद्दा मी एैरणीवर घेतला आहे. तुम्हाला आठवण करुन देण्यासाठी मी 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहे असेही ते म्हणाले.
...म्हणून सत्तेत आहोत
जनतेचा आवाज म्हणून आम्ही सत्तेत आहोत मात्र सत्तेसमोर शेपूट हालवणारा मी नाही, प्रसंगी जनतेच्या प्रश्नावर आसूड ओढण्याचे काम आम्ही करत आहोत असे स्पष्ट करताना सरकार म्हणून दुर्दैवाने तुम्ही अपयशी ठरलात तर जनतेसाठी मी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
पुढचा सीएम सेनेचा
मला कांही व्हायचे नाही, माझ्या स्वप्नासाठी नव्हे तर जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार आहे. जनतेचे प्रेम असेच आयुष्यभर मिळत राहो अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
खा. चंद्रकांत खैरे यांनी मराठवाड्यातील 46 पैकी 40 विधानसभा मतदार संघावर शिवसेनेने लक्ष केंद्रित केलं असून सर्वाधिक आमदार निवडून आणू असा निर्धार बोलून दाखविला. मराठवाड्यात दुष्काळासारखी वाईट परिस्थिती असताना कोणाचं लक्ष आहे ? कोणीच बोलत नाही, एवढेच काय पंतप्रधान सुद्धा फिरकले नाहीत अशी टिका खा. खैरे यांनी केली.
तत्पूर्वी विश्वनाथ नेरुलकर, शोभा बेंजरगे, लक्षमण अदावले यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास दगडोजीराव देशमुख सभागृह खचाखच भरले होते. जिल्हाभरातून बुथप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या कार्यक्रमात प्रथमच प्रभू श्रीरामाची प्रतिमा दिसून आली. त्या प्रतिमेस उद्धव ठाकरेनी पुष्पहार अर्पण केला हे वैशिष्टयच म्हणावे लागेल.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment