बाजार समिती सभापतीपदाची निवडणूक अत्यंत चुरसीच्या वातावरणात होत असून कोणत्याही क्षणी ही निवडणूक वादळी ठरु शकते. हे गृहीत धरुन पोलिस बंदोबस्त तगडा लावण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहेत. धर्माबाद बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे-८, कॉंग्रेसचे-४, व्यापारी व हमाल मापाडी अपक्ष-३, भाजपा-२, शिवसेना-१ असे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडून आलेले संचालक दत्ताहरी पाटील चोळाखेकर हे राष्ट्रवादी सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ एकने घटले आहे.
कॉंग्रेसचे संख्याबळ चार असतानाही बाजार समितीवर सत्ता काबीज करण्यासाठी सरसावली आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून दत्ताहरी पाटील यांनी कॉंग्रेसची वाट धरल्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ पाच झाले आहे. व्यापारी व हमाल मापाडीचे तीन अपक्ष संचालक कॉंग्रेसच्या बाजूने झुकले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ आठवर जावून पोंहचले आहे. भाजपाकडून निवडून आलेले संचालक गणेशराव पाटील करखेलीकर व राजू पाटील बोळसे या दोन संचालकांपैकी राजू पाटील हे पक्षासोबत राहण्याची भुमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीचे नेते बापुसाहेब देशमुख गोरठेकर व गणेशराव करखेलीकर यांच्यात राजकीय कुरघोडी असल्यामुळे करखेलीकर यांचा कल कॉंग्रेसच्या बाजूने आहे.
भाजपाचे नेते राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादीचे सात व शिवसेना-१, भाजपा-१ असे नऊ संचालकांचे संख्याबळ होत आहे. जर करखेलीकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावून कॉंग्रेससोबत जाण्याची भूमिका घेतल्यास कॉंग्रेसचेही संख्याबळ नऊवर येवून ठेपले आहे. अशा अटीतटीच्या वातावरणात बाजार समिती सभापतीची निवडणूक झाल्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे समान संख्याबळ असल्यामुळे ही निवडणूक टॉसवरही होवू शकते किंवा भाजपा किंगमेकरच्या भूमिकेत असल्यामुळे ऐनवेळी सभापतीपद भाजपाला दोण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस राजी होवू शकतात असे जानकरांचे मत आहे. त्यामुळे धर्माबाद बाजार समितीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे येणारा काळच ठरविणार आहे.
!
!

No comments:
Post a Comment