मुगांवकरांनी राजेश पवारासह भाजपा इच्छूकांना सुनावले! मानपान नाट्याने नायगांवच्या सीएम चषक स्पर्धेच्या बैठकीत शाब्दीक खडाजंगी!

Monday, November 26, 2018
विशेष प्रतिनिधी , नायगांव :- संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुख्यमंत्री चषक स्पर्धेत ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खेळाडू सहभागी करुन घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने बारा प्रकारच्या खेळांना प्राधन्य देत ही स्पर्धा आयोजित केली आहे. नायगांव विधानसभा मतदारसंघातही सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी नायगांव येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतील इच्छूक सौ.मीनल खतगांवकर यांचा जाणीवपूर्वक अवमान करण्यासाठी बैठकीचे संयोजक राजेश पवार यांनी पोटोकॉल पाळला नसल्यामुळे खतगांवकर समर्थक गंदीगुडे यांनी बैठकीतच राजेश पवार यांना खडे बोल सुनावले. खतगांवकर-पवार यांच्यातील संघर्षाची झालर बैकीला लागल्याचे दिसताच पंचायत समितीचे उपसभापती अशोक पाटील मुगांवकर यांनी राजेश पवार यांच्यासह सर्व इच्छूकांना खडे बोल सुनावल्यामुळे सर्वसामान्य भाजपा कार्यकर्ता सुखावला होता.


नायगांव विधानसभा मतदार संघाचे भाजपा प्रभारी प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश पवार यांनी सीएम चषक स्पर्धेच्या निमित्ताने २१ नोव्हेंबर २०१८ रोजी नायगांव अंबिका मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. सकाळी १० वाजता आयोजित केलेल्या बैठकीसाठी आयोजक राजेश पवार हेच दुपारी १ वाजता दाखल झाले. त्यामुळे वेळेवर आलेले अनेक कार्यकर्ते ताटकळत बसले होते.

नायगांव विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांची सून जि.प.सदस्या डॉ. मीनल पाटील खतगांवकर हे मतदारसंघात जोरदार जनसंपर्क मोहिम हाती घेवून मतदारसंघाची बांधणी सुरु केली. या मतदारसंघावर स्वत:ची मक्तेदारी सांगणारे गेल्या निवडणूकीत पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार राजेश पवार हे अस्वस्थ झाले आहेत.

मतदारसंघात मीनल खतगांवकर यांनी जबरदस्त मुसंडी मारल्यामुळे राजेश पवार यांनी मीनल खतगांवकर यांच्याविषयी बेताल व्यक्त करण्यास सुरु केले आहे. खतगांवकरच काय? ब्रम्हदेव आले तरी माझी उमेदवारी कोणी कापू शकत नाही असा फाजील आत्मविश्‍वास राजेश पवार यांनी कार्यकर्त्यासमोर उघडपणे व्यक्त करीत आहेत. त्यामुळे खतगांवकर विरुध्द पवार यांच्यात आताच संघर्ष शिगेला पोंहचत चालला आहे. या संघर्षाची ठिणगी नायगांवच्या सीएम चषक स्पर्धेच्या बैठकीत पडली.

त्याचे झाले असे सकाळी १० वाजता सुरु होणारी सीएम चषक स्पर्धेची बैठक दुपारी १ वाजताच आयोजकाच्या उशिरा आगमनामुळे सुरु झाली. बैठकीचे आयोजक राजेश पवार हे असल्यामुळे बैठकीत कोणाला मनोगत व्यक्त करुन द्यायचे की नाही हे त्यांच्या हातात होते. 

महिला भाजपा प्रदेश कार्यकारणीच्या सदस्या जि.प. सदस्या व नायगांव मतदारसंघातील इच्छूक उमेदवार सौ. डॉ. मीनल पाटील खतगांवकर यांना सभेच्या शिष्टाचारानुसार शेवटी मनोगत व्यक्त करण्यास संयोजकांनी सांगायला पाहिजे होते परंतु तसे न करता त्यांना एखाद्या लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागणूक देत सर्वात पहिले आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगून राजेश पवार यांनी सौ. मीनल पाटील खतगांवकर यांचा अवमान केल्याचे खडे बोल खतगांवकर समर्थक भाजपा जिल्हा सरचिटणीस राजू गंदीगुडे यांनी सुनावले. त्यामुळे बैठकीचे वातावरण तापले.

बैठकीतील खतगांवकर-पवार संघर्षाची पडलेली ठिणगी विझविण्याच्या हेतूने पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा राजेश पवार यांचे सध्याचे कट्टर राजकीय सल्लागार अशोक पाटील मुगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, नायगांव मतदारसंघात भाजपाचे कितीही इच्छूक उमेदवार निर्माण व्हा पण एकमेकांचा मानपान राखून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करा, सर्वच इच्छूक उमेदवारांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करायला शिका, आज मी राजेश पवार यांच्यासोबत उघडपणे आहे. 

पण उद्या पक्षाने सौ. मीनल पाटील खतगांवकर किंवा श्रावण पाटील भिलवंडे यांना नायगांव विधानसभेची उमेदवारी दिली तर सर्वात पुढे राहून मी त्यांचा प्रचार करणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष समजा. कार्यकर्ता हा कोणाही एका नेत्याची खाजगी मालमत्ता नाही. तो पक्षाचा कार्यकर्ता आहे, हे इच्छूक उमेदवारांनी लक्षात ठेवावे. पक्षाचा कार्यकर्ताच सोबत नसेल तर इच्छूक उमेदवार काय दिवे लावणार त्यासाठी सर्व इच्छूकांनी आपसातील मतभेद चव्हाट्यावर न आणता कोणीही पक्षाकडे उमेदवारी मागितली तर त्यात गैर काय? याचे भान ठेवून पक्ष बांधणीसाठी एकदिलाने काम करा असा दम दिल्यामुळे तोर्‍यात असलेल्या राजेश पवार यांचा पारा सरकन खाली उतरला.

राजेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सीएम चषक स्पर्धेत जास्तीत जास्त तरुण खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी करुन घेण्यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. राजीव गुंदीगुडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर स्पष्टीकरण देताना राजेश पवार म्हणाले, कळत न कळत माझ्याकडून चुक झाली असेल, यापुढे कुठल्याही बैठकीत सर्वच नेत्यांचा कार्यकर्त्यांचा माझ्याकडून सन्मान राखला जाईल. 

कोणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता अशी स्पष्ट कबुली देत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी कोणालाही मिळो आम्ही सर्व जण कमळ या चिन्हालाच निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करु असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केल्यामुळे बैठकीतील मानपान नाट्यावर पडदा पडला. खतगांवकर-पवार मानपान नाट्य सुरु असताना भाजपाचे तिसरे इच्छूक उमेदवार भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्रावण पाटील भिलवंडे मात्र हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका बजावली हे विशेष

No comments:

Post a Comment