मराठा आरक्षण विधेयकावर विधानसभेची मोहोर : मुख्यमंत्र्यांनी पाळला शब्द: 1 डिसेंबर पूर्वीच मराठा समाजाचा जल्लोष

Thursday, November 29, 2018

मुंबई ;बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयकाला विधानसभेने एकमताने मंजुरी दिली .सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेसह विरोधी पक्षांनीही आरक्षण विधेयकाला पाठिंबा दर्शवल्याने कसलीही चर्चा न करता विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले .विधान परिषदेतही हे विधेयक मांडण्यात आले असून परिषदेची मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल .त्यांच्या मंजुरीनंतर आरक्षणाचा कायदा लागू होईल .

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आंदोलन नको १ डिसेंबरला जल्लोष करा असे म्हणत आरक्षण देणार असल्याचे सुतोवाच केले होते .त्यानुसार आज गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी आरक्षण विधेयक सभागृहात मांडले .मराठा समाजाला एस ई बी सी प्रवर्गातून 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे .50 टक्के मर्यादेच्या पुढे जाऊन आरक्षण दिल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे .कृती अहवालासोबत शुद्धीपत्रक काढून मुख्यमंत्र्यांनी विधेयक सभागृहात मांडले .आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे मागासलेपणाचे तीनही निकष मराठा समाज पूर्ण करत असल्याचा निष्कर्ष मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालात नोंदवण्यात आला आहे .

त्यामुळे हे आरक्षण द्यावे अशी शिफारस करण्यात आली आहे .विधेयक मांडल्यानंतर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांनी विधेयकाचे स्वागत करत आपापल्या पक्षांचा पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली .यानंतर सभागृहात आणि बाहेरही जल्लोष सुरू झाला .विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसह शेकाप ,रा स प, एम आय एम ,आरपीआय व अपक्षांसह सर्वांचेच आभार मानले .सामाजिक प्रश्नांसाठी हे सभागृह एकत्र येऊ शकते हे आपण दाखवून दिले आहे असे ते म्हणाले. विधेयक मंजूर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यास सुरुवात केली .सभागृहाच्या बाहेरही अशाच घोषणा देत जल्लोष सुरू होता.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment