ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका - पंकजाताई मुंडे

Thursday, November 29, 2018
मुंबई :ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये , हे आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे ,असे मत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मांडले .


मराठा समाजाच्या आरक्षण विषयावर विधानभवनात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली .या समितीसमोर पंकजाताईनी आपले मत मांडले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे .त्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू होती .आज दुपारी मराठा आरक्षणाबाबतचा कृती अहवाल विधानसभेत मांडला जाणार आहे.

त्यावर चर्चाही होणार आहे. या आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक झाली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे समितीचे सदस्य उपस्थित होते .

पंकजा मुंडे या समितीच्या सदस्य नाहीत .तरीही त्या बैठकीला उपस्थित होत्या. आपले मत मांडल्यानंतर त्यांनी बैठकीतून निघून जाण्याचा निर्णय घेतला. चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांनी त्यांना समजावले परंतु त्या निघून गेल्या.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही माझी भूमिका मी मांडली आहे .मुख्यमंत्र्यांनाही बोलले असून ते योग्य निर्णय घेतील याची खात्री आहे असे त्या म्हणाल्या .मंत्रिमंडळ उपसमितीची मी सदस्य नाही. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही. माझी कसलीही नाराजी नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment