दोन हजार रुपयांच्या नोटांचे उत्पादन बंद

Sunday, October 7, 2018

नाशिक : देशात नोटाबंदी लागू झाल्यानंतर दोन हजार रुपयांची नोट बाजारात दाखल झाली होती. भारतात कोलकाता येथील सालबोली व बंगळुरू येथे या नोटा उत्पादित केल्या जात होत्या. मात्र, वर्षभरापासून दोन हजार रुपयांच्या नोटांचे उत्पादनही बंद झाले असून, बाजारात ज्या नोटा आहेत, त्या जुन्याच असल्याची माहिती इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिली.

मलेशिया येथे दि. ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान परिषद होत असून, गोडसे पहिल्या कार्यकारिणी बैठकीकरिता रवाना होणार आहेत. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोडसे पुढे म्हणाले, दोन हजार रुपयांच्या नोटांचे नाशकात उत्पादन होत नाही. सध्या बाजारात ज्या नोटा चलनात आहेत, त्या जुन्या आहेत. आरबीआयने वर्षभरापासून दोन हजार रुपयांच्या नोटांचे उत्पादन बंद केले असल्याचे त्यांनी सांगितले.

नोटाबंदीनंतर दोन हजार, पाचशे, दोनशे, पन्नास, दहा व वीस रुपयांच्या नवीन नोटा बाजारात दाखल झाल्या. तर जुन्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, शंभर व वीस रुपयांच्या नवीन नोटा मात्र चलनात नव्हत्या. गत काही दिवसांपासून नाशिकरोड येथील प्रेसमध्ये २० आणि १०० रुपयांच्या नवीन नोटा बनविण्याचे काम सुरू झाले आहे. 

१०० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात दाखल झाल्या असून, इतर राज्यांत त्या दिसू लागल्या आहेत, तर २० रुपयांची नवीन नोट डिसेंबरपर्यंत बाजारात दाखल होणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली. या कॉन्फरन्समधून जगभरातील सिक्युरिटी प्रिंटिंग व पॅकेजिंग क्षेत्रात ज्या घडामोडी घडत आहेत, वेगवेगळ्या देशांमधील या क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न व अडचणी काय आहेत, ते समजून घेतले जाणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment