महाराष्ट्रातील सोयाबीन पेंडच्या खरेदीसाठी चीनचा पुढाकार

Thursday, September 13, 2018

कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांची
 मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा

शेतकर्यांच्या प्रश्नावर बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजचाही पुढाकार

मुंबई, दि. 11 : राज्यात उत्पादीत होणार्या सोयाबीन पेंडच्या (De-oiled cake) (DOC) खरेदीसाठी चीन पुढे आले असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी चीनचे कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शेती उत्पादनांची चीनमध्ये आयात आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी चीन उत्सूक असल्याचे यावेळी कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी सांगितले. चीनसमवेत देवाण-घेवाण अधिक विकसीत करण्यासाठी स्वतंत्र अधिकार्याची नेमणूक करण्यात येईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चीनने यासंदर्भात घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यात उत्पादीत होणार्या सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळणार आहे. 

राज्य कृषी मुल्य आयोग आणि बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंज यांच्या पुढाकाराने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजने शेतकर्यांच्या प्रश्नावर प्रथमच पुढाकार घेतल्याचे दिसले. यावेळी राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल, बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहे. शिवाय राज्यात सोयाबीनवरील प्रक्रीया उद्योगही विकसीत असल्याने चीन देशाला मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेंडचा पुरवठा करता येऊ शकेल. केंद्र शासनानेही यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे हीत लक्षात घेऊन सोयाबीन पेंडला 10 टक्के निर्यात प्रोत्साहन अनुदान (Export intensive) जाहीर केले आहे. यामुळे तसेच सोयाबीन पेंडच्या खरेदीसाठी चीनने दाखविलेल्या उत्साहामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना हमी भावापेक्षा अधिक भाव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याकामी आवश्यक ती सर्व यंत्रणा राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. 

राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल म्हणाले की, यावर्षी देशातून निर्यातीसाठी साधारण 30 लाख टन सोयाबीन पेंड उपलब्ध होईल. त्यापैकी 50 टक्के म्हणजे साधारण 15 लाख टन सोयाबीन पेंड ही महाराष्ट्रातून उपलब्ध होईल. चीन देशाची सोयाबीन पेंडची मागणी भारतातून उपलब्ध होणार्या एकूण सोयाबीन पेंडपेक्षा 10 पटीने अधिक आहे. त्यामुळे चीन ही महाराष्ट्रातील सोयाबीन पेंडच्या विक्रीसाठी खात्रीची बाजारपेठ ठरु शकेल, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य कृषी मुल्य आयोगाच्या याबाबतीतील प्रस्तावास बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजच्या पुढाकाराने चीनच्या कौन्सुलेट जनरल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.

भारतात आणि महाराष्ट्रात उत्पादीत होणारी सोयाबीन पेंड ही नाॅन जेनेटिकली माॅडीफाईड सीडस पासून उत्पादीत होते. जगात अशी सोयाबीन पेंड फक्त भारतातच उत्पादीत होते. रसायनमुक्त असलेल्या या सोयाबीन पेंडला चीनमध्ये मोठी मागणी आहे.

No comments:

Post a Comment