धनंजय मुंडेंच्या मालमत्तेवर टाच विक्री अथवा व्यवहारास बंदी

Thursday, September 13, 2018


 बीड: बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या मालमत्तेवर न्यायालयाने टाच  आणली आहे .मुंडे यांच्या मालकीची संपत्ती विकता येणार नाही अथवा त्यासंबंधीचे व्यवहार करता येणार नाहीत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 परळी येथील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटी रुपये कर्जवसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांची मालमत्ता आता विकता येणार नाही .या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अनेक दिवसानंतर अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली. या गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने धनंजय मुंडे यांचे घर ,सूतगिरणीचे कार्यालय आणि विविध ठिकाणी असणाऱ्या मालमत्तेचे व्यवहार करता येणार नाहीत तसेच त्यातून लाभ घेता येणार नाही असाही आदेश दिला आहे .

धनंजय मुंडे यांच्या देशमुख टाकळी,कौडगाव ,जलालपुर येथील शेतजमीन, परळी येथील घर व सूतगिरणीच्या कार्यालयाच्या  विक्रीस न्यायालयाने बंदी घातली आहे .बीड जिल्हा सहकारी बँकेने संत जगमित्र सूतगिरणीला कर्ज देताना अनेक नियमांचे उल्लंघन केले होते .या बेकायदेशीर कर्ज वितरण प्रकरणी  2 ऑक्टोबर 2013 रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .तीन वर्षानंतर विशेष तपास पथकाने 11 जुलै 2016 रोजी परळी  न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यात बँकेच्या तत्कालीन संचालकांसह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, सुभाष सारडा ,राजाभाऊ मुंडे धैर्यशील साळुंके यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment