इंदौर :शुक्रवारी इंदोर येथे होणाऱ्या बोहरा समाजाच्या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या वेशातील अतिरेकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी त्यादृष्टीने कसून चौकशी सुरू केली आहे.
गुप्तचर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी इंदोर येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे .शुक्रवारी बोहरा समाजाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी इंदौर दौऱ्यावर येणार आहेत .हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ज्या ठिकाणी कार्यक्रमासाठी मंडप उभारण्यात आला आहे
तेथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी सुरू केली आहे .सैफीनगर मस्जिदला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने घेरले आहे .
ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही मोदींच्या आसपास येऊ दिले जाणार नाही .कार्यक्रमाच्या ठिकाणी असणाऱ्या स्वयंसेवकांचीही चौकशी केली जात आहे .या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांमध्ये महिलांचे प्रमाण 60 टक्के असण्याची शक्यता आहे .त्यामुळे 200 महिला स्वयंसेवक तैनात असणार आहेत .सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसही बोहरा महिलांच्या वेशात तैनात राहणार आहेत .सभास्थळी मंडप उभारण्यासाठी 5 हजार टन लोखंडाचा वापर केला गेला आहे .
त्यामुळे मेटल डिटेक्टर च्या माध्यमातून तपासणी केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस उपसंचालक अजय कुमार शर्मा यांनी दिली. एखाद्या बाबतीत धमकी मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने काम केले जाते त्याच पद्धतीने उपाययोजना केल्या जात असून प्रत्येक ठिकाणी पोलिसांची बारीक नजर आहे.शहरातील हॉटेल आणि प्रत्येक कॉलनीतही पोलीस लक्ष ठेवून आहेत असे शर्मा म्हणाले .पोलीस महासंचालक हरिनारायणाचारी मिश्र यांनी मात्र दहशतवादी हल्ला नव्हे तर काहीतरी गडबड होणार असल्याची खबर मिळाली असल्याचे सांगितले .

No comments:
Post a Comment