पेट्रोल आणि डिझेलची शतकासाठी शर्यत- धनंजय मुंडें

Monday, October 1, 2018


बीड दि प्रतिनिधी : 
या सभेत धनंजय मुंडे यांनी नेहमीच्या शैलीत तुफान टोलेबाजी करून सभा चांगलीच गाजवली. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये शतकासाठी जशी शर्यत असते तसे भावाचे शतक कोणाचे आधी पूर्ण होते यावरून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शर्यत सुरु असल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने महामंडळ काढण्याची घोषणा करून फसवणुक करण्यात आली.

 जिल्ह्याला कर्जमाफी मिळाली नाही, बोंडअळीचे नुकसान मिळाले नाही, पिक विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाली तरी त्याचे व्याज मात्र जिल्हा बँकेचे चेअरमन खात असल्याचा घनाघात त्यांनी केला. जिल्ह्याला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, शेतकर्‍याला शेतात काही नाही, घरात काही नाही आणि सरकार फक्त घोषणा देण्याचे काम करत आहे. देशाच्या चौकीदारानेच १२५ कोटी जनतेला फसवले, आरक्षणाच्या नावावर मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला फसवले असल्याचे ते म्हणाले. आजच्या सभेने मागच्या सर्व सभांचे रेकॉर्ड ब्रेक झाले असून जिल्ह्यातील लोकसभेसह विधानसभेच्या सहाही जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

परिवर्तनाची सुरुवात बीडपासून - जयंत पाटील
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमधील परिवर्तनाची सुरुवात आज बीडमधून यशस्वी विजयी संकल्प मेळाव्याने होत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडच्या सर्वपक्ष पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले.


कोठे आहे विकास - अमरसिंह पंडित
या सभेत बोलताना माजी आ.अमरसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्याचे प्रश्‍न मांडताना राज्य आणि केंद्रात सत्ता असतानाही कोठे आहे विकास असा सवाल उपस्थित केला तर हे सरकार फसवे असल्याचा घणाघात माजीमंत्री प्रकाशदादा सोळुंके यांनी घातला.

आयुष्यभर पवारांच्या पाठिशी - संदीप क्षीरसागर
आपण आयुष्यभर श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठिशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू असे युवकनेते संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी आ.जयदत्त क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अक्षय मुंदडा, सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, बाळासाहेब आजबे यांचीही भाषणे झाली.

सतिष शिंदे यांचा प्रवेश आष्टी तालुक्यातील भाजपा युवक नेते, जिल्हा परिषद सदस्य सतिष शिंदे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.


सभेचे क्षणचित्रे ः
* बीडमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक सभा झाल्याची चर्चा संपूर्ण शहरात होती. शहरात सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत संपूर्ण शहरभर मानसेच मानसे दिसत होती. संपूर्ण सभामंडप सभेपूर्वीच भरून गेला होता.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment