दुर्वांचे महात्म्य

Saturday, September 8, 2018

अनलासुर नावाच्या राक्षसाला गिळंकृत केल्याने श्री गणेशाच्या पोटात आगीचा डोंब उठला. अनेक उपाय झाले पण दाह कमी होत नव्हता पण जेव्हा ऋषींनी २१ दुर्वा वाहिल्या तेव्हा मात्र आग शांत झाली. गणेशाचे मन पुलकित झाले तेव्हापासून गणेशाला दुर्वा प्रिय झाल्या. देवांनी त्यांचा गौरव केला व कालानल प्रशमन अशा प्रकारे त्याची स्तुती केली. आणखी एक गोष्ट आहे त्यावरुन दुर्वांकुराची प्रचिती येईल. 

एकदा मिथिलानगरीचा राजा जनक यास आपल्या उदारपणाचा गर्व झाला होता तेव्हा श्री गणेश एका गरीब ब्राह्मणाचे रुप घेऊन जनकाकडे गेले भोजन मागितले व म्हणाले, ‘जनका तू मला पोटभर भोजन देशील तर शंभर यज्ञाचे पुण्य लाभले.’ लगेच जनकाने त्याला स्वयंपाक गृहाकडे नेलेे, याला पोटभर जेवायला घाला असे आचार्यांना सांगितले.ब्राह्मणरुप गणेशाने सर्व अन्न खाऊन टाकले. नगरात असलेले सर्व धान्य शिजवून ब्राह्मणाला घालायचे असा निश्‍चय केला व ब्राह्मणाला वाढले, ब्राह्मण सर्व अन्न फस्त करुन पुन: पुन: मागू लागला. त्यात जनक कमी पडला म्हणून त्याचा धिक्कार करुन गणेश निघाला. 

जनक शरमल्यासारखा झाला. त्याच दिवशी नगरात त्रिशिरा ब्राह्मण व पत्नी विरोचना राहत होती ती दोघे गणेशभक्त होती. त्यांच्या दारी जाऊन ब्राह्मण म्हणाला, ‘मिथीला नगरीच्या जनक राजाने पोटभर अन्न देण्याचे कबुल केले पण सारे व्यर्थच, नगरातही कुठे भिक्षा मिळाली नाही. मी भुकेने व्याकूळ झालो आहे. मला मनोभावे दिलेले थोडे असले तरी पुरे पणगर्वाने दिले तर समाधान होत नाही. 

त्रिशिरा म्हणाला, महाराज आम्ही आज सकाळी श्री गणेशाला वाहण्यासाठी दुर्वा आणल्या होत्या, त्यातील फक्त एकच दुर्वा शिल्लक आहे, ती दुर्वा तुम्हाला मी देतो.ती दुर्वा भक्षण करताच गणेशाची क्षुधा शांत झाली, त्याने ढेकर देऊन आपले खरे रुप प्रकट केले व त्रिशिराला वरदान देऊन निघून गेले.

No comments:

Post a Comment