ब्रह्मदेव एकदा शंकराचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते तेथे नारदही हजर होते. त्यांच्या हातात एक अपूर्व फळ होते ते फळ त्यांनी शंकराला दिले. त्यावेळी तिथे गणेश व षडानन दोघेजण होते त्या फलासाठी दोघांनी आग्रह धरला. शंकर बुचकाळ्यात पडले. त्यांनी ब्रह्मदेवाचा सल्ला घेत विचारले, हे फळ कोणाला देऊ? ब्रह्मदेवांनी ते फळ षडाननाला द्या असे सांगितले. पण गणेश क्रोधीत झाले. ब्रह्मदेव सृष्टी रचनेचे काम करु लागले तेव्हा श्री गणेशाने विराट रुप धारण करुन ब्रह्मदेवाला भयभीतकेले व ब्रह्मदेवाला भयभीत झालेला पाहून शंकराच्या भाळावरील चंद्र गर्वाने हसला आणि गणेशाच्या गजमुखाची कुचेष्ठा करु लागला तेव्हा श्री गणेश संतप्त झाले व चंद्राला शाप देत म्हणाले, ‘आज तू माझ्या रुपाला पाहून हसलास परंतु लोक तुझे मुख पाहणार नाहीत व जो पाहील त्याच्यावर विघ्न येईल’ श्री गणेशाने शाप देताच चंद्र कुरुप बनला व खजीलही झाला.
देवांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांना वाईट वाटले. सर्व देव एकत्रीत आले. चंद्राला क्षमा करण्याची याचना करावयास लागले तेव्हा गणेश म्हणाला, जो कोणी भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला चंद्राकडे पाहिल त्याच्यावर विघ्न येईल अन्यथा नाही. गणेशाने दिलेल्या उ:शापाची माहिती देवांनी चंद्राला सांगितली. गणेशाला प्रसन्न करण्यासाठी इंद्राने चंद्राला एकाक्षर मंत्राचा उपाय सांगितला. चंद्राने गंगानदीकाठी जाऊन श्री गणेशाची भक्ती केली. बारा वर्षानंतर गणेश प्रसन्न झाले व चंद्राला वरदान दिले.
तु पुर्ववत रुपात येशील, वद्य चतुर्थीला रात्री तुझे दर्शन केल्याशिवाय संकष्ट चतुर्थी व्रत पुरे होणार नाही केवळ गणेश चतुर्थी दिवशी तुला पाहणार्यांवर संकट येईल व तुझी अर्धकोर माझ्या मस्ताकवर भूषवितो व शुद्ध द्वितीयेला प्रत्येकजण तुझे दर्शन घेईल. गणेशाच्या उ:शापामुळे चंद्र पुर्ववत स्वरुपशील दिसू लागला. नंतर चंद्राने गणेशमूर्ती त्या जागी स्थापन केली, तिच्या मस्तकावर चंद्रकोर आहे आणि त्यामुळेच गणेशाला भालचंद्र असे नाव पडले.

No comments:
Post a Comment