ब्रह्मदेवाने जांभई दिली व त्यातून त्यांच्या मुखाद्वारे शेंदरी वर्णाचा एक मुलगा निघाला. त्याला ब्रह्मदेवाने सांगितले की तू या विश्वात वाटेल तिकडे संचार कर, तुला कसलेच भय वाटणार नाही व तू ज्याला मिठी मारशील तो जळून राख होईल तुझा रंग शेंदूराचा म्हणून सिंदूर या नावाने ख्याती मिळेल.
वर खरा की खोटा हे पाहण्यासाठी त्याने ब्रह्मदेवालाच मिठी मारण्यास धाव घेतली व त्यामुळे ब्रह्मदेवाने परत त्याला शाप दिला की तू दैत्य होशील व गणेश तुझा वध करील.
सिंदूरासुराने सर्वांना त्रासून सोडले तेव्हा श्रीगणेशाने अवतार घेतला. गणेश काही दिवस पाराशरांच्या आश्रमात राहिला. मोठा झाल्यावर सिंदूराच्या वधाची कल्पना देऊन पाराशरांची परवानगी व आशिर्वाद घेऊन मूषकावर स्वारहोऊन व हातात अंकूश, परशू, पाश घेऊन विष्णूचे स्मरण करून सिंदूराच्या नगरात आला व मोठ्या गर्जना केली. त्या गर्जनेने सबंध नगर हादरले. तेव्हा दैत्यांनी त्याला विचारले, तू आहेस तरी कोण? तेव्हा गजानन म्हणाला मी शंकर पार्वतीचा पुत्र व तुझा कर्दनकाळ आहे. सिंदूरदैतयाला निरोप द्या की तुझा नाश करण्यासाठी आलो आहे, तेव्हा तू युद्धाला सज्ज हो.
दूतांनी गणेशाचा निरोप सिंदूराला दिला. तेव्हा सिंदूरासूर संतापाने युद्धास आला. श्रीगणेशाच्या ठिकाणी त्याला अनंत रूपाची विराट शक्ती दिली. ते पाहून सिंदूरासूर अत्यंत घाबरून गेला. क्षणभर तो विचारातच पडला. मग मात्र अत्यंत आवेश आणून गणेशाबरोबर लढण्यास तयार झाला. तेव्हा गणेशाने त्याला धरून उचलले व स्वतःच्या अंगावर रगडले. त्यामुळे सिंदूरासुराचा तांबडा रंग गणेशाच्या सर्वांगाला लागला म्हणून गजाननाला सिंदूरवदन असे नाव पडले. मग गणेशाने शक्ती एकवटून आपल्याच अंगावर जोराने रगडले त्यामुळे त्याचा वध झाला.
देवांनी गणेशावर विजयी पष्पे उधळली व राक्षसांच्या उपाद्रवापासून मुक्त झालो म्हणून सुटकेचा निःश्वास सोडला. सिंदूरासुराचा श्रीगणेशाने वध केला व त्याचा रंग स्वतः धारण केला. म्हणून सिंदूरवदन हे नाव गणेशाला पडले.

No comments:
Post a Comment