भाऊरावच्या युनीट विक्रीची अफवा - खा. चव्हाण

Saturday, September 22, 2018

विशेष प्रतिनिधी
नांदेड-भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या सर्व युनीटची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे. एका कारखान्यापासून भाऊरावने चार साखर कारखाने निर्माण केले आहेत. कोणत्याही कारखान्याच्या युनीटची विक्री करण्याची नामुष्की वेळ सभासदांवर येवू देणार नाही. कारखान्याच्या युनीटची विक्रीची ही अफवा माध्यमांनी पेरलेले विष आहे. विरोधकांच्या अशा विषारी प्रचाराला सभासदांनी बळी न पडता घाबरुन जावू नये असे आवाहन कारखान्याचे संस्थापक खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या 25 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी भाऊरावचे चेअरमन गणपतराव तिडके, नांदेड बाजार समितीचे सभापती बी.आर. कदम, कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास दाड, संचालक श्यामराव टेकाळे, कार्यकारी संचालक शाम पाटील, जि. प.सदस्य कल्याणे सह सर्व संचालक उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात केवळ भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चारही युनिट सक्षमतेने चालूआहेत. गेल्या वर्षी 14 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. भाऊरावचे तीन युनीट कर्जमुक्त झाले आहेत. शासनाने भाऊरावला 68 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. कारखान्याच्या 60 हजार लिटरचा इथेनॉल प्रकल्प सुरु झाल्यावर हे सर्व कर्ज फेडले जाईल. सभासदांचा अपघात विमा एक लाखावरुन दोन लाख केले आहे.

शासनाने साखर खुली केल्यामुळे साखरेचे भाव पडले आहेत. साखर 2900 प्रती क्विंटलच्या कमी विकू नये असा पवित्रा केंद्र शासनाने घेतला आहे, चढाओढ करून ऊसाला ज्यादा भाव दिल्यामुळे अनेक कारखाने बंद पडले आहेत. ऊसाला एफआरपीप्रमाणे भाव दिल्यामुळे भाऊरावला 52 कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कारखान्याची आर्थिक सक्षमता सक्षम आहे. एखाद्या युनीट भाडे तत्वावर चालविण्यास द्यावा काय? यावर कारखान्याच्या सर्व साधारण सभेत चर्चा करण्यासाठी तो विषय विषयपत्रिकेवर घेण्यात आला आहे. विरोधकांनी माध्यमांना हातीशी धरुन भाऊरावचे युनीट विक्री करणार असल्याचे विषारी प्रचार सुरु केले आहे. त्यामुळे सभासदांनी घाबरुन न जाता कोणतेही युनीट विक्री करण्याची नामुष्की तुमच्यावर येवू देणार नाही अशा विश्‍वास खा. चव्हाण यांनी यावेळी सभासदांना दिला आहे.

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी वर जागोजागी अडविण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी लेखी पत्र आपण मुख्यमंत्र्यांना दिले आहे. वरच्या भागात पैनगंगेचे पाणी आडवून आपली साखर कारखानदारी अडचणीत आणण्याचा प्रयत्न होणार असेल तर त्याच्याविरुध्द आवाज उठविण्यासाठी जन आंदोलन उभा केले जाईल. शेतकर्‍यांचे पैसे बुडविणार्‍याच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन करावे आमचा कारखाना शेतकर्‍यांचे सर्व पैसे चुकते करण्यास सक्षम असल्याचा दावा खा. चव्हाण यांनी यावेळी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी धर्माधिकारी, प्रस्तावित गणपतराव तिडके व आभार व्यंकटराव कल्याणकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment