हिंगोली / प्रतिनिधी
तालुक्यातील ईडोळी येथे दारूची अवैधरित्या सर्रासपणे विक्री सुरू आहे. परिणामी, अनेकजण व्यसनाधिनतेकडे वळू लागले असून, युवा वर्गही बळी पडू लागला आहे. त्यामुळे गावात अवैधरित्या सुरू असलेली दारूची विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी 18 सप्टेंबर रोजी ईडोळी येथील महिलांनी जि.प.सभापती रेणुका जाधव यांच्या नेतृत्वाखाली थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून कैफियत मांडली.
शहरासह ग्रामीण भागात दारूची अवैधरित्या विक्री होत आहे. दारू विक्री गावात तंटे उद्भवण्यास कारणीभूत ठरत असून, गावातील शांतता भंग होत आहे. शिवाय युवापिढी व्यसनाधिनतेकडे वळू लागल्याने हा विषय चिंतेचा ठरत आहे. हिंगोली तालुक्यातील ईडोळी येथे मागील अनेक महिन्यांपासून दारूची विनापरवाना विक्री सुरू आहे. या दारू विक्रीमुळे गावात अनेक दारूडे दारू पिऊन रस्त्यावर आरडाओरड करीत असतात. शिवाय ये-जा करणाऱ्यांना शिवीगाळ करीत असतात. त्यामुळे गावात तंटे निर्माण होत आहेत.
तसेच महिला, मुलींना रस्त्याने ये-जा करणे अवघड झाले आहे. गावात दारू विक्री करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असता दारू विक्रेत्यांकडून धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून दारू बंदीची मागणी केली. याशिवाय जुगार, ईडोळी परिसरातून वाहणाऱ्या कयाधू नदीच्या पात्रातून वाळूची अवैधरित्या उपसा यावरही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले. यावेळी जि.प.सदस्या रेणुका जाधव, चेअरमन काशीराम जाधव, भानुदास जाधव, ज्ञानबा जाधव यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment