आता शेतीवर ड्रोनचा डोळा

Tuesday, August 28, 2018

 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स  तंत्रज्ञान वापरण्यास मुख्यमंत्री  अनुकूल पाशा पटेल यांची धडपड यशस्वी

 लातूर :बेंगलोर येथील  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था विविध कारणांनी संकटात सापडणाऱ्या   शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन आली  आहे. या संस्थेने विकसित केलेले अद्ययावत तंत्रज्ञान शेतीसाठी वापरावे म्हणून राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची धडपड सुरू होती .मुख्यमंत्र्यांनी याला अनुकूलता दर्शवल्यामुळे आता आयआयटीचे ड्रोन  शेतकऱ्यांना मदत करणार आहेत

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने शेतकऱ्यांना मदत करणारे ड्रोन विकसित केलेले आहेत. हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे आहे .त्यामुळे त्याचा वापर करावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती .तंत्रज्ञानाची उपयुक्तता लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात शास्त्रज्ञांची बैठक घेऊन हे तंत्रज्ञान उपयोगात आणण्याच्या सूचना केल्या होत्या .यानुसार  सोमवारी राज्यातील चार कृषी विद्यापीठांचे संशोधक आणि तंत्रज्ञांची बैठक पार पडली. एस पी सिंग यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीस संशोधक केपीजी  रेड्डी ,ओंकार यांच्यासह राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचीही उपस्थिती होती .तंत्रज्ञानाची उपयुक्तता आणि वापर यावर या बैठकीत चर्चा झाली . संशोधक आणि तंत्रज्ञानी अद्ययावत तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचा निर्वाळा या बैठकीत दिला .त्यामुळे आयआयटीने विकसित केलेले आणि आतापर्यंत बंद खोलीत पडून असणारे हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

 आयआयटीचे तंत्रज्ञान  शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे .या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी किती क्षेत्रावर पेरणी केली, नेमके कोणते पीक  शेतकरी घेत आहेत याची माहिती मिळू शकणार आहे .यासोबतच  मातीमध्ये ओलावा आहे की नाही हे देखील पाहता येणार आहे . शेतकऱ्याच्या पिकांची स्थिती आणि होणारे उत्पादन याचा अंदाज घेता येणार असून पडणारे विविध रोग आणि होणारा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वसूचना देता येणे शक्य होणार आहे .हे अद्ययावत तंत्रज्ञान वापरले तर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात होणारा अनावश्यक खर्च कमी होणार आहे. या सोबतच नेमके कोणते पिक घ्यावे याचीही माहिती मिळणार आहे. विविध कारणांनी शेतकरी संकटात सापडत असताना आता अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून या माध्यमातून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment