हिंगोली / प्रतिनिधी
मराठा समाजा पाठोपाठ आरक्षणासाठी धनगर समाजानेही एल्गार पुकारला आहे. सरकारने निवडणुकीपुर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचे म्हणणे मांडत 27 ऑगस्ट रोजी हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर बांधवांनी ढोल जागर मोर्चा काढून आंदोलन केले. हजारो समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
राज्य घटनेत महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश आहे. परंतु, सवलती मिळत नाहीत. गत वर्षापासून धनगर समाज सवलतीपासून वंचीत ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात असून, अजुनही सरकारकडून चालढकल सुरू आहे. सत्तेत आल्यानंतर तातडीने धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती करण्यात येतील, असे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र, चार वर्षाचा काळ लोटलातरी सवलती लागू केल्या नाहीत. परिणामी, आजही धनगर समाज बांधव न्यायहक्काच्या प्रतिक्षेत आहेत. अनेकवेळा मागण्या केल्या, आंदोलनेही केली. परंतु, सरकारकडून समाजाची सतत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप धनगर बांधवांनी ढोल जागर आंदोलनादरम्यान केला.
हिंगोली शहरात सोमवारी दुपारच्या सुमारास शासकीय विश्रामगृहापासून धनगर समाज बांधवांचा ढोल जागर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. इंदिरा गांधी चौक, बस स्थानक, नांदेड नाकामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे समाज बांधवांची भाषणे झाली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांना देण्यात आले. त्यावर शिवाजी ढाले, ऍड.गणेशराव ढाले, ऍड.गयबाराव नाईक, केशव नाईक, विनोद नाईक, शशीकांत वडकुते, पंढरी ढाले, गणेशराव गडदे, नामदेव कुरवाडे यांची नावे आहेत.
येळकोट...येळकोट..जय मल्हारचा गजर...
आंदोलनादरम्यान येळकोट..येळकोट...जय मल्हारच्या गजराने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. लहान बालकांसह समाज बांधव, महिला या आंदोलनात उतरल्या होत्या. घटनेप्रमाणे धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये असलातरी सवलतीपासून वंचीत ठेवण्याचे षङयंत्र मागील वर्षापासून सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. आरक्षणाच्या मागणीवरून समाज पेटला असून, सरकारने याउपरही चालढकल केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
No comments:
Post a Comment