रक्षाबंधन करून देशरक्षणासाठी निघालेल्या जवानाचा अपघातील मृत्यू

Tuesday, August 28, 2018


 
हिंगोली / प्रतिनिधी  
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पिपळदरी येथील जवान आपल्या सुट्या संपवून झारखंड राची येथे जात असताना 27 ऑगस्ट रोजी हिंगोली तालुक्यातील अंधरवाडी परिसरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत जवानाचे नाव प्रविण गायकवाड वय 23 वर्ष असे आहे.  रविवारी  रक्षाबंधन आटोपून देश रक्षणासाठी निघालेल्या या जवानाच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  

      प्रविण हे मुळचे गंगाखेड तालुक्यातील पिपळदरी येथील ते 23 मार्च 2015 रोजी भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण श्री संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिपळदरी येथे झाले. सैन्यात भरती होवून देशसेवेचे स्वप्न गायकवाड यांनी पाहिले होते. 11 महिने मध्यप्रदेशमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ते सैन्यदलात झारखंड राची येथे कर्तव्यावर होते. 27 जुलै ते 27 ऑगस्ट अशी एका महिन्याची सुट्टी काढून जवान प्रविण पिपळदरी येथे आले होते. 26 ऑगस्ट रोजी आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधून देशसेवेसाठी निघालेल्या प्रविण गायकवाड यांना नियतीने हिरावले. 

त्यांचा मृतदेह हिंगोली तालुक्यातील अंधरवाडी रेल्वे परिसरात आढळला. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पेट्रोलिंग दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास हा मृतदेह आढळला, ही माहिती रेल्वे पोलीसांना देण्यात आली. त्यानंतर हिंगोली ग्रामीण ठाण्यातील कर्मचारी राजेश ठोके व रविकांत हरकळ यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्यांचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी सकाळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांनी दिली असून सोमवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार होते. प्रविण हे अत्यंत गरीब कुटूंबातून सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे

No comments:

Post a Comment