नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी होऊ घातलेल्या सर्वपक्षीय आघाडीचे नेते कोण असतील किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल हे आताच न ठरवता लढत द्यावी आणि निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होईल याचा निर्णय घ्यावा असा फॉर्मुला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसला दिला आहे .एका अर्थाने बिनचेहऱ्याची आघाडी करून मोदींना पराभूत करा असे सांगतानाच २००४ साली अटलजींना पराभूत करण्यासाठी अशीच आघाडी झाल्याचा दाखला त्यांनी दिला आहे .
गेल्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी असा सूर निघत आहे .परंतु या आघाडीचा नेता आणि निवडणूक जिंकल्यास पंतप्रधान कोण होणार हा वादाचा विषय आहे .याबाबत ज्या राज्यात जो पक्ष मजबूत आहे त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे सूत्र ठरले आहे . राहुल गांधींनी पंतप्रधान पद सर्वाधिक खासदार असणाऱ्या पक्षाला देण्याबाबत सूचना केली आहे .त्याचप्रमाणे सर्वांनी एकत्रित लढावे आणि निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होईल याचा निर्णय करावा .
महाराष्ट्रात लढताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पन्नास - पन्नास टक्के जागा लढवाव्यात असेहीपवारांनी सुचवले आहे .भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात . मनसेलाही आघाडीत सहभागी करता येऊ शकते ,असे पवार म्हणाले . एकंदर भाजपाला आणि पर्यायाने मोदींना रोखण्यासाठी पवारांनी दिलेला फॉर्मुला वापरला तर ही बिनचेहऱ्याची आघाडी होणार असून ती कितपत मजल मारते हे निवडणुकीत स्पष्ट होणार आहे . सध्या मात्र शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे पत्ते झाकून ठेवल्याचे या फॉर्म्युल्यामुळे उघड होत आहे .
No comments:
Post a Comment