गडकरी सरांनी घेतला कार्यकर्त्यांचा क्लास

Sunday, August 26, 2018

श्रद्धांजली कार्यक्रमात नेत्यांनाही सुनावले 

नागपूर : चहा आणि बिस्कीट मेळाले नाहीत म्हणून भांडणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी आपण अटलजींचे विचार किती जाणतो याचा विचार करावा केवळ पदे आणि मान सन्मान मिळावा यासाठी भांडू नये असे सांगत अटलजींच्या श्रद्धांजली सभेत गडकरींनी आठवणींना उजाळा देतानाच पक्षाचे विद्यमान नेते आणि कार्यकर्त्यांचा क्लास घेतला.

पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते फक्त स्वतःबद्दल विचार करुन छोट्या छोट्या मुद्द्यांवर भांडत आहेत. नाव पत्रिकेत छापलं नाही, पातळ हार घालून स्वागत केले, योग्य सन्मान केला नाही, घ्यायला कार्यकर्ते नाही आले, फक्त चहाच दिला-बिस्किट दिले नाही अशा मुद्द्यांवर पक्षात वादावादी होते, हे गडकरींनी सर्वादेखत सांगितले . 

लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार संकुचित मनाचे आहेत . अमुक कार्यकर्त्याला मंचावर बसवू नका, त्याला पक्षात घेऊ नका असे मुद्दे घेऊन वाद घालत बसतात. छोट्या मनाने आपल्याला अटलजींच्या विचारांवर कसं चालता येईल? असा प्रश्न गडकरींनी उपस्थित केला .

अटलजी जसे होते, तसे आपण आहोत का याचा विचार करा अशा शब्दात गडकरींनी कार्यकर्त्यांना सुनावले. पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डात अटलजी होते. मात्र त्यांनी कधीच आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी पद किंवा उमेदवारी मागितली नाही. पक्षाचे अनेक निर्णय त्यांच्या इच्छेविरोधातही व्हायचे, त्यांनी कधीच त्याला विरोध केला नाही. ते त्यांच्या व्यवहारातूनही लोकशाहीचे उपासक होते, असं गडकरी म्हणाले.

अटलजीमुळेच आज आपला देश अण्वस्त्रधारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अटलजींच्या आधीही भारतीय शास्त्रज्ञ देशाला अण्वस्त्र संपन्न बनवू शकत होते. मात्र पंतप्रधान शास्त्रज्ञांना परवानगी देत नव्हते. अटलजींनी एपीजे अब्दुल कलाम यांना पोखरण चाचण्या करण्याची परवानगी दिली. म्हणून देशाची ताकद वाढल्याचं फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment