लातूर :काँग्रेसची सत्ता खालसा करून लातूर जिल्हा भाजपमय करण्यासाठी नेतेमंडळींनी प्रयत्न केले .या प्रयत्नांना यशही आले .परंतु आता हे यश अनेकांच्या डोळ्यात खूपत आहे .यामुळेच भाजपातील काही मंडळीकडून भाजपाला अर्थात स्वतःच्या पक्षाला संपवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. अहमदपूर पंचायत समितीच्या उपसभापतीवर मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाने या अंदाजावर शिक्कामोर्तब झाले आहे. अहमदपूर प्रकरणात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची भूमिकाही वादात सापडली असल्याचे दिसून येत आहे .
अहमदपूर पंचायत समितीच्या उपसभापतीवर अविश्वास ठराव मंजूर झाला .ठराव आल्यानंतर तो येऊ नये किंवा आलाच तर सन्माननीय तोडगा भाजपला काढता आला असता .विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले आणि संघाच्या मुशीत तयार झालेले नागनाथ निडवदे हे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत .त्यांनी प्रयत्न केले असते किंवा ठरावावरील चर्चा आणि मतदानावेळी व्हीप काढला असता तर हा अविश्वास ठराव बारगळला असताअविश्वास ठरावाच्या वेळी जिल्हाध्यक्ष निडवदे आ विनायकराव पाटील यांच्यासमवेत विश्रामगृहावर बसून होते .पण त्यांनी व्हीप काढला नाही . उलट स्थानिक गटबाजीला खतपाणी घालण्याचे काम केले .
गटबाजी सर्वच पक्षात असते. तशी काँग्रेसमध्येही ती आहे. परंतु जेव्हा पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा नेते आणि कार्यकर्ते हे पक्ष एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदपूर पंचायत समितीच्या उपसभापतीवर विचित्र पद्धतीने अविश्वास ठराव आणण्यात आला. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या काळापासून येलम समाज हा भाजपाच्या पाठीशी आहे. माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या भावाची पत्नी मंगलाबाई खंडाडे या उपसभापती होत्या . विशेष म्हणजे त्या देखील येलम आहेत .असे असताना हा चुकीचा पायंडा अहमदपूर येथे पाडण्यात आल्याचे दिसून येत आहे .या प्रकरणात चूक कोणाची आणि बरोबर कोण हे शोधण्यापेक्षा घडलेला प्रकार चुकीचा आहे हे निश्चित .मुळात लातूर जिल्ह्यात भाजपा अंतर्गत वातावरण बिघडले असून ते सुधारण्याची आवश्यकता आहे .आ. विनायकराव पाटील हे आज भाजपात असले तरी ते अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. अहमदपूर तालुक्यात भाजपातील अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागलेले आहेत .परंतु असे असले तरी आमदार पाटील यांच्या कर्तृत्वाबाबत कोणालाही वाईट वाटण्याचे कारण नाही. अविश्वास ठरावाच्या प्रकाराने आमदारांना मान खाली घालायला लावण्याचे षडयंत्र काहीजणांनी आखल्याचे दिसून येत आहे .भाजपाच्या बदनामीचे हे अक्षम्य पाप केले जात आहे. आगामी लोकसभेत जिल्ह्यातील वातावरण भाजपाच्या विरोधात जाऊन ते काँग्रेसला अनुकूल असावे यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment