दोन तास चर्चा, सात तास वेटींग मागण्या मान्यतेबाबत पालकमंत्र्यांचे आश्वासन

Wednesday, August 15, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
सकल मराठा समाजाच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी विविध सात मागण्यांचे निवेदन पालकमंत्री दिलीप कांबळे यांना देण्यात आले. पालकमंत्र्यांनी यातील जिल्हास्तरीवरील मागण्या मी मान्य करतो असे आश्वासित करून उर्वरित मागण्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलून आपणास कळवितो, असा शब्द सकल मराठा समाजाला दिला होता. त्यामुळे दोन तास चर्चा करूनही सात तास वेटींग करावी लागली आहे. तरीसुद्धा सायंकाळी सात वाजेपर्यंत असे कोणतेही पत्र सकल मराठा समाजाचा हाताला लागले नव्हते. 

येथील गांधी चौकात 30 जुलैपासून मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी 14 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाज व पालकमंत्री दिलीप कांबळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मनियार, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने आदींची उपस्थिती होती. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यासोबत तब्बल दोन तास चर्चा झाली. या चर्चेत येथील तोफखाना परिसरातील जुना सरकारी दवाखाना एका महिन्यात डागडूगी करून मराठा विद्यार्थ्यांना वसतीगृह म्हणून उपलब्ध करून दिला जाईल. तसेच मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे चौकशी अंती एका महिन्यात मागे घेण्यात येतील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या अडचणीबाबत जिल्हाधिकारी व बॅंकेचे अधिकारी यांची बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे लेखी पत्रही मराठा समन्वयकांना दिले जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच ध्वजारोहणाला उपस्थित राहण्याबाबत राज्याच्या प्रमुखांशी बोलल्यानंतर तासभरात तो निर्णय मी आपणास कळवेल असेही पालकमंत्री म्हणाले. व इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून आपणास लेखी आश्वासित केले जाईल, असे सांगण्यात आले होते. पण सायंकाळी सहा वाजेपर्यंत असे कोणतेही पत्र सकल मराठा समाजाच्या हातात आले नसल्याची चर्चा होती. 

पालकमंत्र्यांच्या या भुमिकेवरून पालकमंत्र्यांनी सकल मराठा समाजाला झुलवत ठेवले आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहणाबाबतही अधिकृत भुमिका सकल मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहणाला हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र यामागे मराठा समाजाचा काही गमिनी कावा आहे का, हे मात्र समजु शकले नाही.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment