जन्म-मृत्यूचा कर्ता-करविता भगवंतच-प.पु. आप्पाबाबा

Wednesday, August 15, 2018


हिंगोली / प्रतिनिधी 
देवच आपले आयुष्य वाढवू शकतो, मरणही चुकवू शकतो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मानव देहाची मुक्ती करण्याची शक्ती केवळ भगवंतातच आहे. भगवंतच आपल्या आयुष्याचा डॉक्टर आहे. त्यामुळे संसार माया सोडून देवाजवळ या कर्ता-करविता हा भगवंतच आहे, असे प्रतिपादन प.पु. आप्पा बाबा महाराज यांनी अनुष्ठाण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी हिंगोली येथे बोलताना व्यक्त केेले. 

येथील शास्त्री नगर मध्ये दिलीप गुंडेवार यांच्या निवासस्थानी रूईभर संस्थान निवासी प.पु. आप्पाबाबा यांचे श्रावण मासानिमीत्त अनुष्ठाण प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी पुढे बोलताना आप्पाबाबा म्हणाले की, आज धार्मिक शिक्षणाची व्याख्या दिवसेंदिवस बदलत चालली आहे. त्यामुळे आपण आधर्माकडे ओढले जात आहोत, नव्या पिढीला जुन्या पिढीचे विचार कालबाह्य वाटायला लागले आहेत. समजुतदारपणा संपुष्टात आला आहे, असे वास्तविक त्यांनी यावेळी बोलून दाखविले. 

आपण सर्वजण संसाराला चिटकून बसल्यामुळे आपल्याला देवाची जाणीव होत नाही. संत रामदासांनी याबाबत विचार व्यक्त केेले असून संसार करावा नेटका, कु ठेही नसावा फाटका असा संदेश दिला आहे. पण आपण याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहोत. त्यामुळे संत समजून घ्या, संतांचा अधिकार समजून घ्या, आपण केवळ पापे धुण्यासाठी तीर्थ यात्रा करतो पण आपलेच पाप पुन्हा आपल्या अंगावर येत असतात. त्यामुळे संत हे पाप आपल्या पायावर घेवून ते पवित्र करण्याचा प्रयत्न करीत असतात. तीर्थाला पवित्र करण्याचा अधिकार आणि कर्तव्य संताकडेच आहे. 

भगवंताच्या भक्तीबाबत बोलताना बाबा म्हणाले की, भगवंताचे खरे भक्त कधीच श्रीमंत नसतात. त्यामुळे भक्ती करत असताना अहंकार येता कामा नये, नाही तर बुडालं असेही त्यांनी सांगितले. दानाविषयी बोलताना महाराज म्हणाले की, कबीर कहे कमाल से, बेटा दो बाते लिख ले, भुके को तुकडा और प्यासे को पाणी दे दे. हे खरे दान आहे. सोयऱ्या धायऱ्यात पंगत उठविणे म्हणजे अन्नदान नव्हे, अन्नदान करताना आपण निरपेक्ष असलो पाहिजे. तरच त्यामागचा हेतू साध्य होत असतो असेही मार्गदर्शन प.पु. आप्पा बाबा यांनी केले. या अनुष्ठाण प्रवचन कार्यक्रमाला महिला भाविकांची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment