आंदोलनाची धग कायम अर्धनग्न रास्ता रोको

Wednesday, July 25, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेल्या ठोक मोर्चामुळे काल मंगळवारी हिंगोली जिल्हा कडकडीत बंद होता. तर दुसऱ्या दिवशी आज बुधवारीही ठोक मोर्चाची धग कायम आहे. हिंगोली तालुक्यातील केसापूरजवळ संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर बाभळीचे झाड टाकून आंदोलनाची तीव्रता वाढविली तर हिंगोली-परभणी राज्य रस्त्यावर देवाळा फाटाजवळ मोर्चेकऱ्यांनी अर्धनग्न होत सरकारविरूद्ध घोषणाबाजी करून रास्ता रोको केला. आज सकाळपासूनच हिंगोली आगारातून एकही बस धावली नाही. 


काल मंगळवारपासून ठोक मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. काल दिवसभर जिल्हा कडकडीत बंद होता. आज दुसऱ्या दिवशीही या आंदोलनाची तीव्रता कायम असून ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळते. हिंगोली आगारातून आज एकही बस सोडण्यात आली नाही. हिंगोली तालुक्यातील केसापूर पाटीजवळ बाभळीचे झाड आडवे पाडून वाहतुक रोखण्यात आली. या रास्ता रोकोमुळे सकाळी आठ वाजल्यापासून हिंगोली व सेनगावकडे वाहतुक ठप्प झाली आहे. या आंदोलनात केसापूर, घोटा देवी, नर्सी नामदेव यासह मराठा समाजबांधवांनी सहभाग नोंदविला आहे. 


तसेच हिंगोली-परभणी या राज्य रस्त्यावरील देवाळा फाट्यावर सकाळी 11 च्या सुमारास अर्धनग्न आंदोलन केले. रस्त्याच्या मधोमध टायर जाळून सरकारविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलकांनी रूग्णवाहिका, पंढरीवरून येणाऱ्या दिंड्या व शाळेच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने परिस्थिती शांत झाली. पण संतप्त झालेल्या आंदोलकांनी औंढा नागनाथकडे कुच करत हिवरा फाटा येथे रास्ता रोको केला. त्याचबरोबर हिंगोली तालुक्यातील सिरसम येथेही गावकऱ्यांनी रास्ता रोको करत आरक्षणाची मागणी केली. दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्ह्यात तणावपुर्ण शांतता होती.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment