अन्यथा गुरं-ढोरं, लेकराबाळांसह रस्त्यावर उतरू

Monday, July 30, 2018



मराठा समाजाचे हिंगोलीत ठिय्या तर माळेगावला रास्ता रोको आंदोलन 
हिंगोली / प्रतिनिधी 
महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ, तोडफोडीच्या घटनेतून आपला रोष व्यक्त केला आहे. शासन दखल घेत नसल्याने आता हिंगोली येथील गांधी चौकात मराठा समाजाच्या वतीने 30 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास गुरं-ढोरं, लेकराबाळांसह रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. तर कळमनुरी तालुक्यातील माळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

       29 जुलै रोजी लातूर येथे मराठा समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरविण्यात आली. त्या अनुषंगाने हिंगोली येथे आंदोलनकर्त्यांनी 30 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शासन केवळ बैठका घेऊन मराठा समाजाची दिशाभूल करत असून मराठा समाजाला प्रत्यक्ष आरक्षण लागू करावे, बैठका चर्चा आता मान्य नाहीत असा सूर ठिय्या आंदोलनातून निघाला. हे ठिय्या आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हाभरातील गावकऱ्यांना तारीख वाटून दिली आहे. त्या दिवशी ते गावकरी येवून गांधी चौकात सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवितील. 





तसेच रोजच नाविन्यपुर्ण मार्गाने आंदोलन पुढे नेले जाणार आहेत. 8 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या आमदारांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात येणार असून 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदमध्ये हिंगोली जिल्हाही सहभाग नोंदविणार आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शासकीय कार्यालय, शाळा बंद करून जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. तोपर्यंत शासनाने दखल न घेतल्यास गुरं-ढोर, लेकरांबाळांसह मराठा समाजाच्या वतीने गावाजवळून जवळ असलेल्या राज्य रस्त्यावर ठाण मांडण्यात येणार आहे.

 असा गंभीर इशाराही या ठिय्या आंदोलनात देण्यात आला.  तसेच कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथे आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको केला, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या आंदोलकांमुळे हिंगोली-नांदेड राज्य रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान आंदोलकांनी एका रूग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. 

त्याचबरोबर सेनगाव तालुक्यातील तळणी, सिनगी नागा, वटकळी येथे रास्ता रोको करण्यात आला. व औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे बंद पाळण्यात आला. दिवसेंदिवस मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने सुरूच आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या सात दिवसांपासून लाल परीची चाके एकाच जागेवर रूतली आहेत.

No comments:

Post a Comment