हिंगोली / प्रतिनिधी
मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी जिल्ह्यात सेनगाव, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर तसेच औंढा-जिंतुर रोडवर दौडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरू होते. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास संतप्त झालेल्या आंदोलकांनी कळमनुरी तालुक्यातील दाती फाटा येथे ट्रक फुकुन दिला. तर आखाडा बाळापूरातील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहाची तोडफोड केली. तसेच आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आ. रामराव वडकुते यांना धक्काबुक्की करण्यात आली. या आंदोलनामुळे हिंगोली-नांदेड महामार्ग बंद पडला आहे. सेनगाव येथेही बीडीओंची खुर्ची जाळून मोर्चेकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. या हिंसक आंदोलावरून जिल्ह्यात मराठा आरक्षण पुन्हा पेटल्याचे चित्र आहे.
आखाडा बाळापूर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने दुपारी 1 च्या सुमारास रास्तारोको आंदोलन सुरू झाले. या आंदोलनास विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आ.रामराव वडकुते यांनी हजेरी लावून माईक ताब्यात घेत, आंदोलकांना संबोधीत करण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त झालेल्या जमावाने माईक हिसकावून घेत त्यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार वाढत गेल्याने समयसुचकता दाखवून आ.वडकुते यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेत थेट बाबुराव वानखेडे यांचे निवासस्थान गाठले. या घाईगडबडीत त्यांचे पादत्राणे घटनास्थळावर पडून राहिले. हिंगोली-नांदेड महामार्गावरील दाती फाट्याजवळ संतप्त आंदोलकांनी ट्रक पेटवून दिला.
त्यामुळे हा महामार्ग पुर्णत: बंद झाला आहे. तसेच संतप्त जमावाने आखाडा बाळापूरातील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहाची तोडफोड केली. सेनगाव येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर काही अज्ञात आंदोलकांनी पंचायत समिती गाठत बिडीओेंची खुर्ची जाळली. तर औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा-जिंतुर रोडवर दौडगाव पाटीजवळ टायर फुकुन देत रस्त्यावर झाडे आडवी केली. त्यामुळे हा रस्ताही ठप्प झाला आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या रास्ता रोको, जाळपोळीमुळे हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाचे चित्र उग्र झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात तणावपुर्ण शांतता असून तीन दिवसांपासून हिंगोली आगारातून एकही बस धावली नाही.
No comments:
Post a Comment