स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मृतदेहाच्या नशीबी हालच औंढा नगर पंचायत हद्दीतील प्रकार, कोट्यावधींच्या निधीचे काय?

Sunday, July 29, 2018



हिंगोली / ज्ञानेश्वर लोंढे 
देश शायनिंग इंडियापासून डिजीटल इंडिया व्हाया मेक इन इंडिया पर्यंत जावून पोहोचला आहे. असे चित्र एकीकडे उभे केले जात असताना औंढा नगर पंचायतच्या हद्दीत घडलेल्या संतापजनक प्रकरणामुळे काजीदरा तांड्याच्या लोकांवर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचे कारणही तसेच असून केवळ तांड्याला पक्का रस्ता नसल्याने सुभद्रा राठोड या 19 वर्षीय आजारी नवविवाहीतेला खाटेवरून उपचाराला नेत असताना मृत्यू झाला. हा मृतदेह परत त्याच मार्गाने  चिखलातून रस्ता काढत काजीदरा तांड्याकडे नेण्याचा संतापजनक प्रकार घडल्याने ग्रामस्थांतून चिड व्यक्त होत आहे. 

       औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग असलेली औंढा ग्रामपंचायत गेल्या दोन ते तीन वर्षापुर्वीच नगर पंचायत झाली आहे. याच नगर पंचायतीच्या हद्दीत प्रभाग क्र. 2 मध्ये काजीदरा तांडा ही वस्ती येते. औंढा शहरापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर वनवासी जीवन जगत असलेल्या 500 लोकांची वस्ती म्हणजे काजीदरा तांडा होय. विशेष म्हणजे औंढा नगर पंचायतीच्या हद्दीतील ही वस्ती कच्च्या चिखल रस्त्यातून जाते. यामुळे अनेक जणांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून मोल मजुरीचा मार्ग स्विकारला आहे. गेल्या चार वर्षात केवळ पावसाळ्यात रस्त्यावर चिखल असल्याने चार ते पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नगर पंचायत हद्दीत असलेल्या या ग्रामस्थांना चिखल तुडवत हिंगोली-औंढा रस्ता जवळ करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात हे संघर्षाचे जीन या लोकांच्या नितीनियमाचे झाले आहे. 29 जुलै रोजी पुन्हा एक संतापजनक प्रकार घडला असून तीन महिन्यांपुर्वीच विवाह झालेल्या सुभद्रा विलास राठोड ही महिला आजारी झाल्याने कुटूंबियांनी खाटेवर टाकून औंढा जवळ करण्याचा प्रयत्न केला असता केवळ उपचाराला वेळ झाल्याने या नवविवाहीतेला मृत्यूने गाठले. त्यामुळे आल्या पाऊली ग्रामस्थांनी हा मृतदेह खाटेवर टाकून मुख्य रस्त्यापासून तांड्याकडे नेला अशा दुदैवी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. हा रस्ता जर पक्का असता तर या नवविवाहीतेला आज जीव गमवावा लागला नसता अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांतून येत आहे. केवळ मरण येत नाही म्हणून जीवन जगत असलेल्या काजीदरा तांडा येथील ग्रामस्थ उगवला दिवस पुढे ढकलत आहेत. हे वास्तव असतानाही लोकप्रतिनिधी, औंढा नगरपंचायतचे नगराध्यक्ष, अधिकारी डोेळेझाक करत असल्याने ग्रामस्थांतून संतापाचा पारा वाढत आहे. विशेष म्हणजे या प्रभागाचे नगरसेवक मारोती राठोड नुकतेच उपनगराध्यक्ष झाले आहेत. औंढा नगर पंचायतीला नुकताच कोट्यावधी रूपयांचा निधी आला असून औंढ नगर पंचायतीने यातील काही निधी या रस्त्यावर खर्च करणे गरजेचे असताना तसे झाल्याचे दिसून येत नाही. केवळ नगर पंचायतीच्या हलगर्जीपणामुळेच दिवसेंदिवस मृत्यूच्या आकड्यात वाढ होत आहे. 







उपनगराध्यक्ष राठोड यांची हतबलता 
औंढा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे मारोती राठोड यांची निवड झाली आहे. त्यांच्याशी संपर्क केला असता या तांड्याला रस्ता व्हावा यासाठी नगर पालिकेचे सीओ, तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहेत असे सांगत या रस्त्याचे नारळही खा. राजीव सातव यांच्या हस्ते फोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खराब रस्त्यामुळे आतापर्यंत चार ते पाच जणांना आपला जीव गमवावा लागला असून येत्या 5 ऑगस्टला हे तांडावासी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडणार आहेत. दैनिक मराठवाडा नेताशी बोलता उपनगराध्यक्ष मारोती राठोड यांच्या बोलण्यातून त्यांची हतबलता दिसून येत होती. 

भुसंपादन विभागाकडे हा विषय पाठविला आहे- मुख्याधिकारी प्रचंडराव 
काजीदरा तांडा या गावाच्या रस्त्याचा विषय गंभीर असून याबाबत कायदेशीर बाबी पुर्ण करण्यासाठी हा विषय भुसंपादन विभागाकडे औंढा नगर पंचायतीच्या वतीने पाठविण्यात आला असून कायदेशीर बाबी पुर्ण झाल्यानंतर लवकरच हा रस्ता करण्यात येईल अशी प्रतिक्रिया औंढा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शशिकांत प्रचंडराव यांनी दिली आहे.   

लवकरच रस्त्याचे काम-आ. टारफे 
मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामाला मंजूरी देण्यात आली असून सर्वेमध्ये हा रस्ता घेण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरूवात होईल असे कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संतोष टारफे यांनी सांगितले.  

No comments:

Post a Comment