हिंगोली / प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात विविध पद्धतीने आंदोलन सुरू आहे. त्यातच आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील गांधी चौक ातील एका इमारतीवर चढून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दिलीप पवार असं या व्यक्तीचे नाव असून त्याना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालेला दिसून येतो. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन केली जात आहेत. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांची उदाहरणे ताजी असताना हिंगोलीतही आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. हिंगोली तालुक्यातील खांबाळा येथील रहिवाशी असलेले दिलीप पवार वय अंदाजे 50 वर्ष सायंकाळी सातच्या सुमारास येथील गांधी चौकातून जवळच असलेल्या एका उंच इमारतीवर चढले होते. मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत घोषणाबाजी केली अशी माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही बाब रस्त्यावरून ये-जा करत असणाऱ्या बघ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ खाली उतरविण्याची विनंती केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला आहे. सदरील व्यक्तीला शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदले यांच्याशी विचारणा केली असता सदरील व्यक्ती हा नशेत असल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार असे सांगून अधिक माहिती देण्यास टाळले आहे.
No comments:
Post a Comment