जालना जिल्ह्यातील विकास कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांचे निर्देश

Tuesday, January 15, 2019




मुंबई : जालना जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि जलद गतीने पूर्ण करा. शासनाच्या विविध जन कल्याणकरी योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आढावा बैठकीत दिले.
जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामे आणि योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या आढावा बैठकीत मानव विकास मिशन अंतर्गत परतूर आणि जाफराबाद तालुक्यातील विविध योजनांची अंमलबजावणी करणे, राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत परतूर तालुक्यातील आष्टी येथे सुरू असलेल्या विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेणे, जालना जिल्ह्यातील ऊर्जा विभागातील कामांचा आढावा घेणे, पालकमंत्री पाणंद रस्ते योजनांचा आढावा, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना,मागेल त्याला शेततळे, सिंचन विहीर व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणे, जिल्ह्यातील विविध रस्ते आणि पुलांच्या कामाचा आढावा आणि जालना जिल्हा पर्यटन विकास आराखडा या विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती.

श्री. लोणीकर म्हणाले, जिल्ह्यातील शेततळे, सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा आणि कामे जलद गतीने पूर्ण करा. तसेच पालकमंत्री पाणंद रस्ते योजनांचा जास्तीत जास्त गावांना लाभ मिळेल याची दक्षता घ्या आणि जिल्हा पाणंदमुक्त करा. तसेच जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गाचे व त्यावरील उड्डाणपुलाचे आणि भारतमाला योजनेचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेगाने करण्याचे निर्देश श्री. लोणीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

श्री. लोणीकर म्हणाले, नेर (शिवली) सह इतर 132 के व्ही सब स्टेशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करून जिल्ह्यातील हायवेलगत असणाऱ्या सब स्टेशनवर इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॉईंटचे नियोजन करा, ऊर्जा,बांधकाम आणि रस्त्यांची कामे वेगाने आणि नियमात पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशा सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यात ज्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, त्या गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करा तसेच त्या गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे काम तात्काळ हाती घ्या, असे निर्देश श्री. लोणीकर यांनी दिले.

जालना तालुक्यातील नांगरतास, शंभुमहादेव, गोखुरेश्वर, नेर तर मंठा तालुक्यातील देवी, निलकंठेश्वर पाटोदा ( गणपती ) व परतूर तालुक्यातील आष्टी खांडेश्वर, चतुरवेदेश्वर येथील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करा, असे निर्देश श्री. लोणीकर यांनी यावेळी दिले. यावेळी जालना जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment