शैलेश गोजमगुंडे सभापतीपदी कायम
लातूर :लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवड प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करीत सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेने सभापती निवडीसाठी राबविलेली प्रक्रिया वैध ठरवली .उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरल्याने स्थायी समितीमधून निवृत्त झालेले व नव्याने निवडलेले सदस्य कायम राहणार असून सर्वांचे लक्ष लागलेले सभापतिपद भाजपाचे शैलेश गोजमगुंडे यांच्याकडेच कायम राहणार आहे .
ठराविक कालावधीनंतर स्थायी समितीचे सदस्य निवृत्त होतात. सभापतींचा कार्यकाळ निश्चित असतो. लातूर महापालिकेचे काही सदस्य वर्षभराच्या कालावधीनंतर निवृत्त झाले .चिठ्ठ्या टाकून निवृत्त होणाऱ्यांची नावे ठरवण्यात आली .नंतरच्या काळात रिक्त जागी नव्या सदस्यांची निवड करण्यात आली .त्यानंतर सभापतींची निवड होणे अपेक्षित होते. समसमान बलाबल असलेल्या या समितीमध्ये काँग्रेसचे अशोक गोविंदपूरकर चिठ्ठीवर सभापती झाले होते .पुढील सभापती निवडीची प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे लांबली होती .आचारसंहिता संपल्यानंतर कायद्याचा आधार घेत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने स्थायी समिती सभापतींची निवड केली होती
.बहुमत असल्याने भाजपाचे शैलेश गोजमगुंडे सभापतीपदी विराजमान झाले होते .परंतु काँग्रेसच्यावतीने ॲड . दीपक सूळ यांनी या संपूर्ण प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते .उच्च न्यायालयाने त्या याचिकेवर निर्णय देताना शैलेश गोजमगुंडे यांची निवड तसेच सदस्यांचीही निवड अवैध ठरवून ही प्रक्रिया पुन्हा घेण्याचे आदेश दिले होते. शैलेश गोजमगुंडे यांच्यावतीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते .या प्रकरणी आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली. त्यात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करीत सभापती निवडीसाठी महापालिकेने राबवलेली प्रक्रिया योग्य असल्याचा निर्वाळा दिला .तसेच स्थायी समितीचे सदस्य आणि सभापती निवडीची प्रक्रिया वैध असल्याने समितीचे सदस्य आणि सभापती कायम राहतील असाही आदेश दिला. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचे शैलेश गोजमगुंडे हेच कायम राहणार आहेत.
संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे शहरवासीयांचे न्यायालयाचा निर्णयाकडे लक्ष लागले होते .न्यायालयाच्या या निकालाने भाजपात उत्साह संचारला असून काँग्रेसला मात्र चपराक बसली.

No comments:
Post a Comment