गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पर्जन्यमान कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न मिळत नाही़ यामुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेदिवस वाढत आहे. कर्ज कसे फेडणार या विवचनेतून यंदाही मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या एक हजाराजवळ पोचली. विभागातल्या आठही जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यानंतर फक्त उन्हाळाच सुरू आहे. यंदा ७७९ मि.मी. सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ ५०१.७४ मि.मी. (६४.४१ टक्के) पाऊस झाला.
ऐन पावसाळ्यात कोरड्यामागून कोरडे गेलेल्या नक्षत्रांमुळे अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा दुबार पेरा केला, परंतु पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या. ज्यांनी कसाबसा कापूस जगवला अशा शेतकऱ्यांचे नशीब यंदाही बोंडअळीने पोखरले. या स्थितीमध्ये अनेक जिल्ह्यात रब्बीची पेरणीच केली नाही. एकीकडे पेरणीसाठी घेतलेले कर्ज, घरात खाणारी तोंडे दहा, त्यात लहानग्यांचे शिक्षण यातून संसाराला ठिगळ लावायचे कसे? या विवंचनेत मराठवाड्यातील शेतकरी त्रस्त आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक ९९ आत्महत्या नोव्हेंबर महिन्यात झाल्या असून त्या खालोखाल ९२ शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात जीवन संपवले. एकूण आत्महत्यांमध्ये सर्वाधिक १९७ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून, औरंगाबाद जिल्ह्यात १४९ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळवले.

No comments:
Post a Comment