औरंगाबाद : 'कामधंदा करत नाही, आयते खाते' असे टोमणे मारत रॉकेल टाकून पेटवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न करणारी सासू शबनूरबी जब्बार खान हिला सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी शुक्रवारी (११ जानेवारी) ठोठावली.
या प्रकरणी पीडित विवाहिता भोरिबी हरुण शेख (२४, रा. मोहाली आडगाव, ता.औरंगाबाद) हिने फिर्याद दिली होती. तिचे लग्न आरोपी हरुण खान जब्बार खान याच्याशी २००७ मध्ये झाले होते. लग्नानंतर भोरिबी हिला सहा महिने चांगले वागवले, पण नंतर 'तुला कामधंदा येत नाही' असे म्हणत तिचा शारीरिक-मानसिक छळ करण्यात येत होता. याच कारणास्तव मारहाण करून घराबाहेर काढले व उपाशीही ठेवले होते.
२३ जानेवारी २०११ रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्या घरात होत्या, तर तिचा आरोपी पती घराबाहेर गेला होता. त्याचवेळी आरोपी सासू शबनूरबी जब्बार खान (५२) हिचा वाद होऊन 'कामधंदा येत नाही, आयते खाते, थांब तुला जाळूनच टाकते' असे सुनावत सासूने तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. यात ती ३५ टक्के जळाली. त्यानंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी भोरिबी हिने दिलेल्या तक्रारीवरुन भादंवि ३०७, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment