सावधान ! लातुरात होणार पाणीकपात.

Wednesday, December 12, 2018
लातूर: लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. असे असतानाही पाणी वाया जाण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला पाठवला आहे .यामुळे आगामी काही दिवसात लातुरात 25टक्के पाणी कपातीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


यंदाच्या पावसाळ्यात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही .यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढला नाही .सध्या धरणात मृतसाठा शिल्लक आहे. त्यातूनच लातुरला पाणीपुरवठा सुरू आहे .परंतु अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना तसेच बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे .पुढील पावसाळ्यास आणखी किमान सात महिन्यांचा अवकाश आहे. 

त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळेच महापालिकेला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. शहरात आजही 30 टक्के पाणी वाया जात असल्याचा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे .वाया जाणारे पाणी वाचले तर लातूर वरील संकट काही प्रमाणात कमी होणार आहे .सध्या लातूर शहरात आठवड्यातून एक वेळा पाणी सोडले जाते.

परंतु अनेक ठिकाणी गरजेच्या वेळेपेक्षा अधिक वेळ पाणी सुरू असते. तासनतास पाणी येत असल्याने नागरिकही त्याचा गैरवापर करतात .यामुळे सध्याच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत 25टक्के कपात करण्याची शिफारस महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला केली आहे.

यासोबतच अवैध जोडण्या तोडणे तसेच अनधिकृत नळ जोडण्याना दंड लावून त्या नियमित करणे, ज्या नळाला तोटी नाही त्याला तोटी बसवून पाचशे रुपये दंड आकारण्यात अशा शिफारशी पालिका प्रशासनाने स्थायी समितीला केल्या आहेत .या प्रस्तावावर समिती काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे .

महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीने काहीही निर्णय घेतला तरी उपलब्ध पाणी पावसाळ्यापर्यंत पुरावे यासाठी नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे .यासाठी शहरातील नागरिकांना आपली मानसिकता बदलावी लागणार असून पाण्याची काटकसर करण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे.

असे झाले तरच लातूरला पावसाळ्यापर्यंत पाणी पुरणार आहे .अन्यथा दोन वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला तीच वेळ पुन्हा येणार आहे. किंबहुना लातूरच्या खासदारांनी म्हटल्याप्रमाणे विमानाने पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावरही विचार करावा लागणार आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment