पालकमंत्री निलंगेकरांच्या पाठपुराव्यास यश
लातूर ः- जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे उभे करण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेतलेला आहे. या पुढाकारातून जिल्ह्यातील बहुतांश राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होत असून यापैकी कांही महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच कांही महामार्गाचे काम लवकरच सुरु होणार असले तरी त्या रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक होती. ही बाब लक्षात घेवून पालकमंत्री निलंगेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली होती. या मागणीला यश आलेले असून जिल्ह्यातील प्रस्तावीत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी २३ कोटी ४२ लाख निधीस मंजुरी मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसार देशभरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग उभे करण्याचे काम सुरु झालेले आहे. त्यानुसारच जिल्ह्यातही राष्ट्रीय महामार्गाचे जाळे उभे करावे याकरीता पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेतलेला होता. या पुढाकारातून जिल्ह्यातील बहुतांश राज्यमार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात होत आहे. या महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून हे महामार्ग समृद्धी मार्ग ठरणार आहेत. मंजूर झालेल्या राष्ट्रीय महामार्गापैकी अनेक महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर प्रस्तावित महामार्गांचे काम लवकरच सुरु होणार आहेत. मात्र ज्या महामार्गाचे काम चालू झालेले नाहीत त्यांची दुरावस्था झालेली आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून अपघातही होऊ लागले आहेत. हि बाब लक्षात घेवून पालकमंत्री निलंगेकर यांनी प्रस्तावित महामार्ग दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. या दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करावा अशी मागणी केली होती.
या मागणीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील महामार्ग क्र. ६३ अंतर्गत असलेल्या आष्टा मोड नळेगाव मार्गे उदगीर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ८६ लाख तर महामार्ग क्र. ६३ अंतर्गतच असलेल्या लातूर ते येडशी या महामार्ग दुरुस्तीसाठी १४ कोटी ५६ लाख त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग ३६३ अंतर्गत येणार्या चाकूर शहरातील रस्त्यांची दुरुस्तीस ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष बाब म्हणून जिल्ह्यातील प्रस्तावित महामार्गांच्या दुरुस्तीसाठी २३ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

No comments:
Post a Comment