जालना : राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पहिलं मराठा जात प्रमाणपत्र जालना जिल्ह्यातील अंबड येथील वैभव ढेंबरे या विद्यार्थ्यांला देण्यात आले. अवघ्या एका तासात हे प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.
वैभव यानं अंबड तहसील कार्यालयापासून जवळच असलेल्या महा- ई-सेवा केंद्रात जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून उपविभागीय अधिकार्यांकडे ते पाठवण्यात आले. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले. वैभव ढेंबरे हा अंबड शहरातील मत्सोदरी महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेतो आहे. या जात प्रमाणपत्राचा त्याला त्याच्या पुढील शिक्षणासाठी फायदा होणार आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याने त्याचा आनंद व्यक्त केला. मराठा आरक्षण मिळावं यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष सुरू होता, तो या प्रमाणपत्रामुळे संपला असं म्हणायला हरकत नाही.
मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 16 टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने आता मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गासाठी आवश्यक असणारं जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यासंदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आणि त्याचबरोबर ही दोन्ही प्रमाणपत्र कशी असतील याचे नमुने प्रसिद्ध केले. मराठा समाजासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्य सरकारने एटीआर आणि विधेयक सादर करून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला. या विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी देण्यात आली.

No comments:
Post a Comment