नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरपदाचा उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर 24 तासांच्या आत शक्तिकांत दास यांची गर्व्हनरपदी निवड करण्यात आली. मात्र ही निवड वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता असून, दास यांची निवड चुकीची असल्याची टीका भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
सुब्रमण्यम स्वामी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत शक्तिकांत दास यांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी निवड अत्यंत चुकीची असल्याचे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. दास हे पी चिदंबरम यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे निकटवर्तीय असून त्यांना न्यायालयीन खटल्यातून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी दास यांनी गव्हर्नरपदाची धुरा आपल्या हाती घेतली. दास यांची या पदी का निवड करण्यात आली हेच मला समजलेले नाही. मी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून माझा या निवडीला विरोध केल्याचे स्वामी यांनी सांगितले. यापूर्वीही स्वामी यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. अनेकवेळा सरकारला त्यांच्यामुळे तोंडघशी पडावे लागले आहे. दास हे भ्रष्टाचारी नेत्यांचे जवळचे असल्याचे आरोपही त्यांनी केला. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही दास यांच्या निवडीवर टीका केली. दास हे अर्थतज्ज्ञ नसून नोकरशाह आहेत. त्यांनी नोटाबंदीचे समर्थन केले आहे. आता सरकार जे सांगेल ते ऐकण्याचे काम दास करतील. आणखी एका संस्थेचे अस्तित्व संपुष्टात येणार अशी खंत सिब्बल यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे. दास यांच्या गर्व्हनरपदाच्या निवड विरोधकांच्या टीकेमुळे वादात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment