भूमिगत गटार योजनेच्या दर्जाहीन कामावर नाराजी

Wednesday, December 5, 2018


हिंगोली / प्रतिनिधी
कोट्यवधी रूपयाच्या निधीतून शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेचे काम दर्जाहीन होत असल्याची ओरड शहरवासीयातून प्रारंभापासूनच सुरू आहे. परंतु, त्याकडे कानाडोळा करीत संबंधीत कंत्राटदार, नगर पालिकेकडून कामाचा दर्जा सुधारण्याऐवजी काम अटोपण्याचा सपाटा सुरू असताना आता राष्ट्रीय समाज पक्षाने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हिंगोली शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या गटार योजनेचे काम गत दीड वर्षापासून हाती घेण्यात आले. परंतु, सुरूवातीपासूनच हे काम चर्चेचा विषय बनले आहे. कामाची संथ गती, दर्जाहीन होत असलेले काम यासह पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या नाल्या व्यवस्थित बुजविण्यात आल्या नसल्याच्या तक्रारीही वाढल्या. जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात भूमिगत गटार योजनेच्या खड्ड्यात पडून एका बालकाचा मृत्यूही झाला होता.

योजनेतंर्गत बांधण्यात येणाऱ्या चेंबरचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप रासपने केला असून, चेंबरला प्लास्टर करण्यात आलेले नाही. शिवाय बांधकाम केल्यानंतर मजबुतीसाठी त्याची 'क्यूरिंग' करणे गरजेचे तसे होत नाही. त्यामुळे या कामाच्या दर्जाची चौकशी करून संबंधितांविरूद्ध कार्यवाही करावी; अन्यथा नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अकोला येथील निवास स्थानासमोर २५ जानेवारी २०१९ पासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष विनायक भिसे पाटील यांनी दिला आहे. 

निवेदनावर पप्पू चव्हाण, गजानन भालेराव, पंढरीनाथ ढाले, राजू पाटील, संतोष भिसे, प्रविण जाधव, जगन काशीद, साहील खान, गजानन कल्याणकर, आसीफ पठाण, मधुकर ठवले, विजय शिंदे, बालाजी टाले, अविनाश कावरखे, योगेशचौधरी, विजयराज काळे, विश्वांबर पटवेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment