भाजपचे महामंत्री दबाव आणतात

Wednesday, December 19, 2018


नागपूर :-
नगर भूमापन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट असून, भाजपचा एक महामंत्री दबाव आणतो, असा आरोप एका महिला अधिकाऱ्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर थेट जनता दरबारात करून सनसनाटी निर्माण केली. या अधिकारी शेवटपर्यंत आपल्या आरोपांवर कायम होत्या. या आरोपांमुळे नागरिकांसमोर पालकमंत्रीव आमदार कृष्णा खोपडे यांची चांगलीच फजिती झाली. त्यामुळे त्यांनी 'आपण चुकीचे बोलल्या' एवढे एकदोन वेळा उच्चारत पालकमंत्र्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.


लकडगंज झोनमध्ये आयोजित जनता दरबारात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नगर भूमापन अधिकारी क्र. २ डॉ. सरिता कडू या कधीच कार्यालयात नसतात, असा आरोप केला. त्यावेळी डॉ. कडू यांनी, भाजपचा एक महामंत्री काम करताना दबाव आणत असल्याचा आरोप केला. कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याशी सामना होऊ नये, नागरिकांचे थेट अर्ज आपल्यापर्यंत येऊन निकाली निघावेत, यासाठीच आपण अशांना टाळत असल्याचे सांगितले. मात्र, काही दलाल कायम दबाव आणतात.

डॉ. कडू यांच्या या आरोपांमुळे भाजपचा 'तो' महामंत्री कोण, अशी चर्चा सुरू झाली. भाजपमध्येही याबद्दल वेगवेगळया नावांवर तर्क मांडले जात होते. भाजपची यामुळे अडचण झाल्याचे दिसत आहे. तर, डॉ. कडू यांच्या भूमिकेमुळे त्यांचे कौतुकही होत आहे. पालकमंत्री जनता दरबारात बहुतांश सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट नाराजी व्यक्त करीत असताना डॉ. कडू यांच्या भूमिकेचे, दरबारात उपस्थित काहींनी आनंदही व्यक्त केला.

No comments:

Post a Comment