केंद्र सरकारची निवडणूकपूर्व भेट जीएसटी कमी केल्याने 33 वस्तू होणार स्वस्त

Sunday, December 23, 2018


नवी दिल्लीः नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलची 31 वी बैठक झाली. या बैठकीमध्ये 33 वस्तूंवर सेवा व वस्तूकर (जीएसटी) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन 33 वस्तूंवर जीएसटी कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. 22 वस्तूंवरील कर 28 टक्क्यांपेक्षा कमी करण्यात आला आहे. 

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये 28 टक्के जीएसटी असलेल्या वस्तूवर कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा वस्तूंवर 28 टक्के जीएसटी होता, तो आता 18 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे आता फक्त 34 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी राहिला आहे. सिनेमाच्या तिकिटावरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. यापुढे शंभर रुपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटावर जीएसटी 12 टक्के, तर शंभर रुपयांपेक्षा जास्त तिकिटावर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. तसेच प्रवास यात्रेवरील जीएसटी पाच टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 32 इंची एलईडी टीव्हीवर 28 टक्के जीएसटी होता. त्यात दहा टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे यापुढे 32 इंचाच्या टीव्ही खरेदीवर 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर टायर, व्हीसीआर, लिथियम बॅटरीवरील 28 टक्के जीएसटी आता 28 टक्क्यांऐवजी 18 टक्के करण्यात आला आहे. 

केंद्र सरकारने एकूण 33 वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु सिमेंट आणि लक्झरी वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम राहणार आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये जीएसटीची चांगली वसुली झाली. गेल्या वर्षी 8 महिन्यांत 48 हजार कोटी भरपाई देण्यात आली, अशी माहितीही जेटली यांनी दिली. पुढील जीएसटी कौन्सिलची बैठक एक जानेवारी 2019 रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये बांधकाम व्यवसायसंबंधी चर्चा होणार आहे. बांधकाम व्यवसायामध्ये जीएसटी कमी करण्याचे संकेत जेटली यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment