संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात अलगरवाडी ग्रामपंचायत मराठवाड्यात प्रथम

Friday, August 10, 2018



लातूर /प्रतिनिधी: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१७  -१८  मध्ये चाकूर तालुक्यातील  अलगरवाडी ग्राम पंचायतीने आपल्या नावलौकिकाला जागत लातूर जिल्ह्याचा झेंडा मराठवाड्यात फडकावला आहे .अलगरवाडी ने या अभियानात मराठवाड्यातून पहिला क्रमांक मिळवला आहे.

 गुरुवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अलगरवाडी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्यात सामाजिक संस्था आणि त्यानंतर विभागीय समितीकडून अलगरवाडीमध्ये झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली होती . त्यानंतरच अलगरवाडीला मराठवाडा स्तरावरून प्रथम क्रमांकाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे . स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे .

अलगरवाडीचे सरपंच गोविंदराव माकणे यांनी वाडीला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले .डासमुक्त गाव, धूर  मुक्त गाव करण्याचा संकल्प करून त्यांनी तो पूर्णत्वास नेला .गावात वृक्षारोपण करून अलगरवाडीला हरित केले. शिक्षणासाठी शाळेवर लक्ष केंद्रित करून गुणवत्ता सुधारली .गावातील सोसायटीच्या कामकाजात बदल घडवला .संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवले. यामुळेच अलगरवाडीला हा पुरस्कार मिळाला आहे.

 पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवले .त्यावेळी देशातील नागरिक अलगरवाडी पाहण्यासाठी येतील असे वक्तव्य त्यांनी केले होते. पालकमंत्र्यांचा हा शब्द तंतोतंत खरा ठरला आहे. आजपर्यंत काशी जगद्गुरु, केदार जगद्गुरु ,गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह जिल्हाधिकारी जी .श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपीन इटनकर ,अहमदपूरचे आमदार विनायकराव पाटील यांनी अलगरवाडीला भेट देऊन तेथील कामाचे कौतुक केले आहे .मराठवाडा स्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सरपंच गोविंदराव माकणे यांचा सत्कार केला .मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर  यांनीही सरपंच माकणे  यांचा सत्कार केला .

आज अलगरवाडी मराठवाड्यात प्रथम आली आहे ती महाराष्ट्रातून प्रथम यावी. अलगरवाडी हे गाव हरित, स्वच्छ व जलयुक्त बनावे अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. या अभियानात पाटोदा तालुक्यातील कुसळंब, तुळजापूर तालुक्यातील अलिदाबाद  या गावांना दुसरा पुरस्कार विभागून देण्यात आला. वसमत तालुक्यातील माळवता या गावाला तिसरा, पाणी व्यवस्थापनासाठी माहूर तालुक्यातील लांजी या गावाला चौथा पुरस्कार देण्यात आला सोनपेठ तालुक्यातील देवीनगर तांडा या गावाला कुटुंब कल्याण क्षेत्रातील कार्यासाठी पाचवा पुरस्कार जाहीर झाला आहे ..औरंगाबाद तालुक्यातील वरजगाव या गावाला सामाजिक एकतेसाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .

No comments:

Post a Comment