रेल्वे बोगी प्रकल्पाच्या कामास आठ दिवसात प्रारंभ : पालकमंत्री निलंगेकर

Friday, August 10, 2018

लातूर /प्रतिनिधी: सत्यजीत बद्दर 

मराठवाड्याचा भाग्योदय करणाऱ्या रेल्वे बोगी तयार करण्याच्या हरंगुळ येथील प्रकल्पाच्या कामास आगामी आठ ते दहा दिवसात प्रारंभ होणार असल्याची माहिती पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पालकमंत्र्यांनी ही घोषणा केली असल्यामुळे हा प्रकल्प होणार की नाही यासंदर्भात विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर मिळाले आहे .

पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की रेल्वे बोगी कारखाना उभारण्याच्या कामाच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. जगप्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रो यांना हे काम मिळाले आहे .या कंपनीकडून आगामी आठ ते दहा दिवसात प्रकल्प उभारणीच्या कामाचा शुभारंभ केला जाणार आहे .हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते .त्यामुळे सरकारने वचनपूर्ती केली असल्याचेही पालकमंत्री म्हणाले .

रेल्वे बोगी तयार करण्याचा कारखाना प्रचंड मोठा असल्यामुळे या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हजारो तरूण व बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्यामुळे बेरोजगारीची समस्या कायमची दूर होणार आहे .लातूरसह संपूर्ण मराठवाड्यातील तरुणांना याचा फायदा होणार असून लातूरची औद्योगिक वाटचाल झपाट्याने होणार आहे .या माध्यमातून लातुरात विकासाची गंगा वाहणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले .

केंद्र व राज्य सरकार हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असतानाही विरोधकांनी या प्रकल्पाच्या बाबत अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. हा प्रकल्प लातूरात होणार नाही अशा अफवा पसरविल्या जात होत्या. केवळ निविदा प्रक्रिया सुरू असून प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असल्याचेही सांगितले जात होते. परंतु आता लवकरच प्रकल्प सुरू होणार असल्याने या सर्व बाबींना सरकारने आपल्या कामाच्या माध्यमातून उत्तर दिले असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment