गाळे लिलाव घोटाळ्यातील दोषी माहूरच्या नगराध्यक्ष-उपाध्यक्षासह 13 नगरसेवक अपात्र

Friday, December 21, 2018


विशेष प्रतिनिधी
नांदेड- माहूर नगरपालिकेने अनाधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या गाळ्यांचा लिलाव घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासह 13 नगरसेवकांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अपात्र ठरविण्याची धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जबर दणका बसला असून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासह विद्यमान नऊ नगरसेवकांवर कारवाई करण्याची ही मराठवाड्यातील पहिलीच मोठी घटना आहे.

नगरपालिकेने बांधलेले गाळे आपल्या नातलगाच्या पदरात टाकताना संबंधितांनी लिलावाच्या वेळेस त्यांच्याकडून अनामत रक्कमही भरून घेतली नाही. एवढेच नव्हे तर बनावट कागदपत्रांचाही त्यासाठी वापर करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार आल्यानंतर त्यांनी दोन्ही बाजुची सुनावणी घेतली. या प्रकरणी अध्यक्ष-उपाध्यक्षांसह 9 नगरसेवक दोषी असल्याचे आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी डोंगरे यांनी या सर्वांना अपात्र ठरविले आहे. 

माहूर नगरपालिका क्षेत्रामध्ये खाजगी व्यक्ती साहेबराव दुबे यांच्या जागेत बनावट कागदपत्रे तयार करून टीनशेडचे 12 गाळे उभारण्यात आले होते. नगराध्यक्ष फिरोज डोसानी व उपाध्यक्ष राजकुमार भोपी यांच्या कार्यकाळात ही प्रक्रिया पूर्ण झाली होती. अनाधिकृतपणे उभारलेल्या या गाळ्यांचे वाटपही अनाधिकृतपणे झाले होते. दरम्यान, जागा मालकाने न्यायालयात याप्रकरणी वाद दाखल केल्यानंतर त्याला स्थगितीही मिळाली. विद्यमान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नऊ नगरसेवकांच्या नातेवाईकांना या गाळ्यांचा लाभ देण्यासाठी हे गाळे उभारण्यात आले होते. दरम्यान, या गाळ्यांची लिलावप्रक्रिया हाताळून नातेवाईकांच्या पदरात हे गाळे टाकताना सर्व नियमही पायदळी तुडविण्यात आले होते. याशिवाय नातेवाईकांना गाळ्याचा लाभ देताना त्यांच्याकडून अनामत रक्कमही भरून घेतली नव्हती. 

अनामत रक्कमनंतर टप्प्याटप्प्याने भरून घेण्यात आली असली तरी या सोईच्या कारभाराची तक्रार शिवलिंग बळीराम टाकळीकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन हे गाळे स्वतःच्या नातेवाईकांना देण्यात आले असल्याची बाब त्यांनी जिल्हाधिकारीकार्‍यांपुढे मांडली. या प्रकरणात माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी व उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी यांच्यासह नऊ नगरसेवकांना पार्टी करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुरु होती. 

या प्रकरणात दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी नगराध्यक्ष दोसानी व उपनगराध्यक्ष भोपी यांच्यासह 13 नगरसेवकांना दोषी ठरविले आहे. यापैकी 12 जणांवर यापूर्वीच 156 (3) नुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी सय्यद रहेमत अली स. महंमद, रफीक सौदागर, वाणी भगवानराव जोगदंड पाटील, ज्योती विनोद कदम, शकीलाबी शेख शब्बीर, शितल मेघराज जाधव, सागर सुधीर महामुने, इलियास बावानी, शरीफाबी शेख अजीज, दिपक जयराम कांबळे, सुधाताई दत्तराव कपाटे यांचा अपात्र सदस्यांमध्ये समावेश आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सदरील कारवाईस दुजोरा दिला आहे.राष्ट्रवादीचे 8, शिवसेनेचे 2, एमआयएम व काँग्रेसचा एक तर राष्ट्रवादीच्या एका स्वीकृत सदस्याचा अपात्रतेत समावेश आहे.




No comments:

Post a Comment