दुष्काळी परिस्थितीमध्ये कोणाकडून ही सत्कार स्वीकारणार नाही : -पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर

Saturday, November 17, 2018

लातूर,दि.17:- शासनाने राज्याच्या इतिहासात प्रथमच माहे नोव्हेंबर मध्ये दुष्काळ जाहीर करुन या कालावधीतील विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केलेली आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

मौजे काटेजवळगा /केदारपूर येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपविभागीय अधिकारी विकास माने, गट विकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, कृषि सभापती बजरंग जाधव, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, महिला व बालकल्याण सभापती संगीता घुले, जिल्हा परिषद सदस्य अरुणा बरमदे, धोंडीराम बिराजदार ,कुसूमतारे हालसे, निलंगा पंचायत समिती सभापती अमित माने, उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे, सरपंच लक्ष्मीतारे रेड्डी , राजकुमार सोमवंशी आदि उपस्थित होते.

पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, जिल्हयातील नागरिकांनी दुष्काळाला चांगले काम करण्याची संधी समजून एकत्रित येऊन जलसंधारणाची कामे करावीत. व आपला जिल्हा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान दयावे. त्याप्रमाणेच जिल्हातील दुष्काळी परिस्थिती पाहता आपण या पुढील काळात कोणाकडून ही सत्कार स्वीकारणार नाही ,असे ही त्यांनी सूचित केले.

आगामी पावसाळयातील पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्याच शेतात-शिवारात मुरविण्यासाठी प्रत्येकांनी प्रामाणिकपणे जलसंधारणाची विविध कामे हाती घ्यावीत असे श्री. निलंगेकर यांनी सांगून पश्चिम महाराष्ट्रातील विकास कामांच्या धर्तीवर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्रीत येऊन विकास कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले.

निलंगा मतदार संघात विविध विकास कामे मोठया प्रमाणावर सुरु आहेत. या भागात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण होत असल्याने या परिसराच्या विकास मोठया प्रमाणावर होईल, अशी ग्वाही श्री. निलंगेकर यांनी देऊन काही विकास कामांना विलंब होत असला तरी ही सर्व कामे अत्यंत गुणवत्तापूर्ण व पारदर्शकपणे होत असल्याने हीच कामे पुन्हा पुढील 25 वर्षे करण्याची गरज राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

या मतदारसंघातील नागरिकांनी आपल्यावर विश्वास दाखवून जनसेवा करणची मोठी संधी दिल्याची जाणीव ठेवून या भागात विकास कामांचे जाळे निर्माण करण्याबरोबरच लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण 2019 अखेर पूर्ण करुन पुढील पाच वर्षात हा रेल्वे मार्ग ही पूर्ण होईल, असा विश्वास श्री. निलंगेकर यांनी व्यक्त केला.

काटेजवळगा ग्रामस्थांना निवडणूकीपूर्वी बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करण्याचे आवाहन पालकमंत्री निलंगेकर यांनी केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देऊन काटेजवळगा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने श्री. निलंगेकर यांनी सरपंच , व सदस्य यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ॲड. नारायण सोमवंशी यांनी विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन दगडू साळूंके यांनी केले. तर आभार राजकुमार सोमवंशी यांनी मानले.


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment